Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
FII Sale : भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचं विदेशी गुंतवणूकदारांचं सत्र सुरु आहे. FPI नं 15 दिवसांमध्ये 22864 कोटी रुपये काढून घेतले.

मुंबई : भारतीय शेअर बाजारातून 2025 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम काढून घेतली आहे. जानेवारीपासून सुरु असलेला ट्रेंड डिसेंबरमध्ये देखील कायम आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यात 22 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या शेअर्सची विक्री केली आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून वित्तीय, माहिती तंत्रज्ञान, सेवा, आरोग्य, ऊर्जा, एफएमसीजी आणि कॅपिटल गुडस् सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील शेअर्सची विक्री करत त्यांची गुंतवणूक काढून घेतली.
FII चा विक्रीचा धडाका कायम
डिसेंबर महिन्यात सर्वाधिक विक्रीचा दबाव वित्तीय सेवांवर दिसून आला. या क्षेत्रात विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात 6516 कोटी रुपयांहून अधिक शेअर्सची विक्री केली. यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा क्रमांक लागतो. दोन्ही सेक्टरमध्ये प्रत्येकी 3000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली. नोव्हेंबर मध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे 5794 कोटी रुपयांचे शेअर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विकत त्यांचे पैसे काढून घेतले होते.
आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक देखील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतली आहे. एफआयआयनं डिसेंबर महिन्यात आरोग्य क्षेत्रातून 2351 कोटी रुपये काढून घेतले. तर, ऊर्जा क्षेत्रातून 2118 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही क्षेत्रात अनुक्रमे 1783 कोटी आणि 2615 कोटी रुपयांची विक्री करत भारतीय बाजारातून विदेशी संस्थांनी पैसे काढून घेतले. फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस क्षेत्रातील स्टॉक्समधून डिसेंबरमध्ये एफआयआयनं 1419 कोटी रुपये काढून घेतले. नोव्हेंबरमध्ये ही रक्कम 4764 कोटी रुपये होती. कॅपिटल गुडस क्षेत्रातील डिसेंबरमधील विक्री 1218 कोटी रुपये आहे. तर, नोव्हेंबरमध्ये या क्षेत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी 2495 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
डिसेंबर महिन्यात टेलिकॉम क्षेत्रातील 879 कोटी रुपयांचे शेअर विक्री करत एफआयआयनं त्यांची गुंतवणूक काढून घेतली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातून विदेशी गुंतवणूकदारांनी 670 कोटी रुपये काढून घेतले.
दरम्यान, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांनी डिसेंबर महिन्यात ऑईल अँड गॅस क्षेत्रातील स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली. डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक या स्टॉक्समध्ये झाली आहे. भारतीय शेअर बाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























