Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित असणाऱ्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आले. या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
भुसावळमध्येही मतदान केंद्रावर पोलीस व निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक- (Bhusaval Election)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 11 ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस व निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. निवडणूक केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले वाहन कर्मचारी सतत ने आण करत असल्यामुळे पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अडवल्याने कर्मचारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन व मतदान केंद्रावरील साहित्य तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी वाहन देण्यात आले आहे. त्यावर मतदान केंद्रावरील परवानगी पत्र देखील लावण्यात आले आहे. मात्र मतदान सुरू झाल्यानंतर सदर वाहन कर्मचारी मतदान केंद्रातून काही साहित्य आणण्यासाठी ने आण करत असल्याने पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अडवत मतदान केंद्रावरच सदर वाहन लावण्याच्या सूचना केल्याने काही काळ गोंधळ उडाला.






















