China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
China Vs India In WTO : अमेरिकेच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भारताशी गोड बोलून बाजारपेठ मिळवायची, तर दुसरीकडे भारताविरोधातच जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करण्याचा डाव चीनकडून खेळला जात आहे.

मुंबई : भारत-चीन (India-China Trade Dispute) या दोन आशियाई महासत्तांमधील व्यापारी तणाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. चीनने भारताविरोधात पुन्हा एकदा जागतिक व्यापार संघटनाकडे (World Trade Organization WTO) धाव घेत तक्रार केली आहे. माहिती व संचार तंत्रज्ञान (ICT Products) क्षेत्रातील आयात शुल्क आणि सौरऊर्जा क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या सब्सिडीवरून हा वाद उफाळून आला आहे. चीनने ही याचिका शुक्रवारी दाखल केली.
India Vs China : WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा चीनचा आरोप
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात भारताने स्वीकारलेली धोरणे WTOच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः नॅशनल प्रिन्सिपल (National Treatment Principle) या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारताची धोरणे आयात-प्रतिस्थापन सब्सिडीच्या श्रेणीत येतात, जी WTOच्या नियमांनुसार थेट प्रतिबंधित आहे, असा दावा चीनने केला आहे.
India-China Trade : देशांतर्गत उद्योगांना फायदा दिल्याचा दावा
चीनच्या म्हणण्यानुसार, भारताच्या सध्याच्या धोरणांमुळे देशांतर्गत उद्योगांना अनुचित स्पर्धात्मक फायदा मिळतो आणि त्यामुळे विदेशी, विशेषतः चिनी कंपन्यांसाठी बाजार असमान बनतो. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तत्त्वांना धक्का बसत असून, चिनी कंपन्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनने भारताला आपल्या WTO जबाबदाऱ्यांचा आदर करून धोरणांमध्ये बदल करण्याचे आवाहन केले आहे.
India WTO News : तोडगा न निघाल्यास पॅनेलकडे जाणार वाद
WTOच्या प्रक्रियेनुसार आता भारत आणि चीन परस्पर चर्चेच्या माध्यमातून (Consultation Process) हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या चर्चेत तोडगा न निघाल्यास प्रकरण विवाद निवारण पॅनेलकडे (Dispute Settlement Panel) पाठवले जाऊ शकते. त्यामुळे हा वाद अधिक गंभीर टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे.
US Tariff On China : ट्रंप टॅरिफनंतर चीनची बदलती रणनीती
डोनाल्ड ट्रंप (Donald Trump Tariffs) यांनी चीनवर कठोर टॅरिफ लादल्यानंतर बीजिंगने भारतासोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न वाढवले होते. अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या काळात भारत हा आशियातील एक महत्त्वाचा पर्यायी भागीदार ठरू शकतो, अशी चीनची भूमिका होती. मात्र, आता WTOमध्ये वारंवार तक्रारी दाखल करून चीन भारतावर कूटनीतिक दबाव वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे.
China Complaints Against China : या वर्षातील दुसरी तक्रार
महत्त्वाचे म्हणजे, याच वर्षात चीनने भारताविरोधात WTOमध्ये दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात चीनने इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी क्षेत्रातील कथित अनुचित सब्सिडीबाबत भारताविरोधात तक्रार दाखल केली होती.























