'एक दिवस बळीराजासाठी'... अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी, राज्यभर 90 दिवसांची मोहिम
Abdul Sattar : आता प्रशासन आणि मंत्री स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्षात जाणार आहेत.विधानसभेत 'एक दिवस बळीराजासाठी'या योजनेची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) नवी घोषणा काल केली आहे. या घोषणेनंतर आता प्रशासन आणि मंत्री स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्षात जाणार आहेत. राज्यात 'एक दिवस बळीराजासाठी' ही संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. विधानसभेत या योजनेची घोषणा करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक अडचणी आहेत, कर्ज आणि अन्य समस्या जवळून जाणून घेणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या दृष्टीकोनातून राज्यात 'एक दिवस बळीराजासाठी' ही मोहीम राबवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
प्रशासन एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी
सत्तार यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
राज्यात पुढील 90 दिवस ही मोहीम राबवण्यात येणार
सत्तार यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागील उद्देश असून राज्यात पुढील 90 दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे, असं देखील कृषीमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार करणार
सत्तार यांनी स्पष्ट केलं की, या मोहिमेअंतर्गत अधिकारी दिवसभर शेतकऱ्यांची दिनचर्या पाहतील, त्यांच्या अडचणी, त्यांचे जगणे समजून घेतील. 90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे.