वाहने सोडण्यासाठी पोलिसांकडून 'चिरीमिरी'; आमदाराने केले स्टिंग ऑपरेशन
घाटात दुरुस्तीचे काम सुरू असतानाही पोलिसांकडून 'चिरीमिरी' घेऊन वाहनं सोडली जात असल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर आमदारांनी स्वत: स्टिंग ऑपरेशन केले.
MLA sting operation in jalgaon अतिवृष्टीमुळे चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात दरडी कोसळून मोठं नुकसान झालं होत. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणाने घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, रात्रीच्या वेळेस पैसे घेऊन काही भ्रष्ट पोलीस वाहनं सोडली जात असल्याची चर्चा सुरू होती. अनेक नागरिकांच्या तक्रारी समोर आल्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालवत नेला आणि भ्रष्ट पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा दावा केला आहे. या पोलिसांविरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
चाळीस गाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः घाटात ट्रक चालवत नेत तक्रारींची पडताळणी केली. आपल्याकडूनही पोलिसांनी 500 रुपये वसूल केले असल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. तर आपण महानिरीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. हे स्टिंग ऑपरेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाळीसगाव कन्नड घाट हा दुरुस्तीच्या कारणाने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वाहतूक बंद असतानादेखील रात्रीच्या वेळेस गस्तीवर असलेले काही पोलीस कर्मचारी ट्रक चालकांकडून 50 ते 1000 रुपयांपर्यंत वसुली करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पहाटे दोन वाजता स्वतः घाटात ट्रक चालवत नेल. त्यांच्याकडून ही पाचशे रुपये वसुली करण्यात आली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. रोज रात्री दोन ते पाच लाख रुपयांची वसुली होत असल्याचे त्यांनी सांगितले. या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
एसटी आंदोलनातून खोत, पडळकर 'आझाद', अॅड. सदावर्ते यांचा हल्लाबोल
70 रुपयांमुळं बाजार उठला! सत्तर रुपयांची लाच घेणाऱ्या महाभागाला नागपुरात एसीबीकडून बेड्या