(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस यांनाच ओएसडी करून टाका, नवाब मलिकांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस हे ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगत असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फडणवीस यांनाच ओएसडी करुन टाका असेही मलिक म्हणाले.
Nawab Malik : महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर एक महिन्यापूर्वी दबाव आणला आणि मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही, म्हणून ईडीची चौकशी मागे लावल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्यसभेच्या सभापतींना थेट पत्र लिहिलं आहे. या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे. माझं म्हणणं आहे की, त्यांना ओएसडी करून टाका. तेच रोज ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आमच्या अनेक मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा लावला आहे. मला ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, त्यांनी राजकीय पक्षाच्या एजंटसारखे काम करू नये. आम्ही राज्यात आहोत लवकरच केंद्रात देखील येऊ असेही मलिक यावेळी म्हणाले. शरद पवार यांना देखील ईडीची नोटीस पाठवली होती. ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जेवढा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच क्षमतेने उभारून वरती येऊ. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकलेला नाही असेही मलिक यावेळी म्हणाले. केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांचे काय चालले आहे हे देखील आम्हाला माहित असल्याचे मलिकांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी ते काहीही करत आहेत. सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशी लावत आहेत. त्यांनी वाटतेय की आमचे नेते भिवून सरकारमधून बाहेर पडतील आणि आमच्यामागे येतील. पण त्यांचा हा गैरसमज असल्याचे मलिक म्हणाले. यातून सत्ता काबीज करता येमार नाही. संजय राऊत यांनी लिहलेली सर्व सत्य परिस्थिती आहे. ईडीचे काही अधिकारी राजीनामा देतात, त्यांना भाजप निवडणुकीसाठी तिकीट देते, अधिकारी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत असल्याचे ते म्हणाले. 5 वर्ष काय 25 वर्ष हे सरकार चालणार आहेत. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून सुरू असल्याचे मलिक यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: