ममता बॅनर्जींचं वर्तन घटनेप्रमाणेच : प्रकाश आंबेडकर
राज्यातील सर्व 48 जागा लढवणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. अकोल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेतही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिले.
लातूर : पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि कोलकाता पोलीस आयुक्तांमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला सहकार्य न करणं हे ममता बॅनर्जींचा वर्तन घटनेप्रमाणेच असल्याचं भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
लातूरमध्ये 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसवरही घणाघाती टीका केली. महाआघाडीचा मुद्दा, लोकसभा निवडणूक या विषयांवर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश सरकारने आणि पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयने राज्यात ढवळाढवळ करु नये, अशी नोटीस दिली आहे. त्यामुळे कायदेशीरित्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कारवाई योग्य आहे. कायदा सुव्यवस्था राज्यातील मुद्दा आहे. अशावेळी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाकडून परवानगी घेऊन किंवा राज्यपालांच्या मदतीनं कारवाई करु शकते. त्यामुळे ममता बॅनर्जींचं वागणं घटनेप्रमाणे अससल्यानं माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना गरज पडली तर मी कोलकात्याला जाणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाआघाडीचा मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जागा वाटप हा मुद्दा नाही. काँग्रेस ज्या जागांवर पराभूत झाली आहे त्या जागांवर आम्ही उमेदवारी मागत आहोत. भाजपला पराभूत करायचं असेल तर काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा. काँग्रेसची आज एवढी ताकद नाही की ते भाजपला हरवू शकतात, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्यातील सर्व 48 जागा लढवणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. अकोल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेतही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिले. व्हिडीओ