उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत आहे. पश्चिम उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Weather Update: राज्यातील हवामान सातत्याने बदलताना दिसतंय. आधी ढगाळ वातावरण, भर थंडीत काही ठिकाणी पावसाची रिपरिप तर काही भागांत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून असाच अनुभव येत असून, पुढील 24 तासांत राज्याच्या किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
राज्यात सध्या थंडीची कोणतीही लाट सक्रिय नाही, उलट किमान तापमान वाढू लागल्यानं दिवसा उष्णता अधिक जाणवत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान वाढीचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका अधिक जाणवेल, असा अंदाज आहे.
काय आहे हवामान विभागाचा इशारा?
कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड परिसरात दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत हवेत आर्द्रता जास्त राहणार असल्याने उकाड्याचा त्रास वाढू शकतो. तर दुसरीकडे, घाटमाथ्यावर पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास गार वारे वाहण्याची शक्यता असली तरी दुपारी मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागानं नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
थंडीच्या लाटांचे इशारे, पावसाच्याही सरी
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत आहे. पश्चिम उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या हिमवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबमध्ये 18, 19 आणि 22 जानेवारी रोजी पावसाचा अंदाज असून, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 19 ते 22 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे देशाच्या उत्तर भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातही हवामानात बदल दिसून येत असून तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एकूणच देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढलेला असून, नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.























