शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुसरी सुनावणी, वकील मांडणार आमदारांची बाजू
आमदार अपात्रतेप्रकरणी 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जाणार आहे.
मुंबई: आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification Case) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष आज पुढची सुनावणी घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी तीन वाजता शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात दुसरी सुनावणी पार पडणार आहे. 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळाली आहे.
आजची सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे procedural directional hearing म्हणून पाहिलं जाणार आहे. ज्यामध्ये या सुनावणी प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येईल म्हणजेच एक प्रकारे या प्रकरणातील सुनावणीचा वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे.त्या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.आजच्या सुनावणीमध्ये सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नाही. आमदारांची बाजू त्या त्या गटाच्या वकिलांकडून आजच्या सुनावणीमध्ये मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आपण या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं ? याचा लेखाजोखा मांडायचा आहे.
14 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यास सांगितले होते. शिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी अधिक विधानसभा अध्यक्षांसमोर होणाऱ्या या प्रकरणातील सुनावणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा : विजय वडेट्टीवार
तर शिवसेना अपात्रतेसंदर्भातील सुनावणी लाईव्ह करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात वडेट्टीवार म्हणाले, शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे . संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे.
हे ही वाचा :