(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तारीख ठरली! 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत 'भगवे वादळ'; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Maratha Reservation : 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी गावात भव्य सभा होणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले आहे.
Chhatrapati Sambhajinagar : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय तापण्याची शक्यता आहे. कारण जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात दंड थोपटणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारने जरांगे यांच्याकडे 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यामुळे या काळात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. सोबतच 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी गावात भव्य सभा होणार असल्याचं देखील जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून मराठा समाजबांधव येण्याची शक्यता असून, अंतरवाली गावात 'भगवे वादळ' पाहायला मिळणार आहे.
मनोज जरांगे राज्यभरात दौरा करणार!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आता राज्याचा दौरा करणार आहे. सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांच्या मुदतीला 14 ऑक्टोबरला 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली गावात 14 तारखेला सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे राज्यभरात दौरा देखील करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे. सोबतच आपल्या दौऱ्यात ते वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाला देखील भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा कसा असणार आणि ते कोणत्या-कोणत्या भागाचा दौरा करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
जरांगे पुन्हा अंतरवाली गावात परतले...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ मुख्यमंत्र्यांनी मागून घेतला होता. दरम्यान, यावेळी जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरण उपोषण देखील सोडलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या विनंतीवरून जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, रुग्णालयातून सुट्टी मिळताच जरांगे पाटील पुन्हा आंतरवाली सराटी गावातील उपोषणास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा साखळी उपोषण सुरू केले आहे.
गोदाकाठावरील 142 गावातील मेळावा
छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेतल्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात उपोषणा स्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे गोदाकाठावरील 142 गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. या नियोजन मेळाव्याला मोठया प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी पुढील आंदोलनाच्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: