(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्गातील दोडामार्ग हेवाळे गावातील 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित
मायरिस्टिका स्वॅम्प परिसंस्था अत्यंत दुर्मीळ असून अशा परिसंस्थांचे वय साधारण 140 दशलक्ष वर्षे इतके आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीत असलेल्या दुर्मीळ अशा 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल जैविक वारसा स्थळ म्हणून राज्य सरकारने घोषित केले आहे. वन विभागाने जैविक विविधता कायद्याअंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांनी या मायरिस्टिका स्वॅम्पच्या देवराईचे संरक्षण केले आहे. महाराष्ट्र आढळणारे मायरिस्टिका स्वॅम्पचे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यातल एकमेव जंगल आहे.
मायरिस्टिका स्वॅम्प परिसंस्था अत्यंत दुर्मीळ असून अशा परिसंस्थांचे वय साधारण 140 दशलक्ष वर्षे इतके आहे. महाराष्ट्रातील आजवर माहित असलेला हा एकमेव गोड्या पाण्याच्या दलदलीचा अधिवास असून यातून बारमाही जिवंत झरे वाहतात. पश्चिम घाट या जैवविविधते समृद्ध पट्ट्यात ही राई सर्वात उत्तरेकडील राई आहे.
भारतात केवळ तीन राज्यांमध्ये मायरिस्टिका स्वॅम्प ही वनस्पती आढळून येते. 'मायरिस्टिका स्वॅम्प'' ही गोड्या पाण्यातील दलदलीच्या वनस्पती परिसंस्था महाराष्ट्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्त्तिवात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जंगलाचे जतन स्थानिकांनी देवराईच्या स्वरुपात केले आहे. हेवाळे-बांबर्डे या गावांच्या हद्दीत असलेल्या या वनस्पतीना कान्हळाची राई म्हटले जात.
कान्हाळाची राई ही हेवाळे बांबर्डे परिसरातील स्थानिकांनी वर्षानुवर्षे राखलेली देवराई आहे. या परिसंस्थेत सापडणारी एकमेवाद्वितीय वृक्ष आणि प्राणी संपदा वाचविण्याच्या दृष्टीने 'जैविक वारसा स्थळ' म्हणून मानांकन होणे ही फार महत्वाची उपलब्धी आहे. या परिसरातील गावांच्या संवर्धनांकार्याचा गौरव आहे. या मानांकनामुळे गावकऱ्यांच्या पारंपरिक हक्कावर गदा येणार नाही. तसेच संवर्धनासाठी गावकरी, अभ्यासक आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या मधील समन्वयाने काम करण्यात येईल. वन विभागाने जैविक विविधता कायदा, 2002 मधील कलम 32 चा वापर करुन या जंगलाला जैविक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रामधील हे चौथे जैविक वारसा स्थळ असून यापूर्वी गडचिरोलीमधील ग्लोरी ऑफ अल्लापल्ली, लँडोरखोरी रिझर्व फॉरेस्ट, जळगाव आणि गणेशखिंड गार्डन, पुणे यांना हा दर्जा देण्यात आला आहे.
'मायरिस्टिका स्वॅम्प' विषयी उष्णकटिबंधीय क्षेत्रात गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरात 'मायरिस्टिका' प्रजातीच्या वृक्षांचे जंगल आढळते. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन फुलझाडांमध्ये या वनस्पतीचा समावेश होतो. जायफळाच्या जातीमध्ये 'मायरिस्टिका' वृक्षांचा समावेश होत असून त्यांना 'आययूसीएन' या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 'धोकाग्रस्त' वृक्षांच्या यादीत स्थान दिले आहे.
कांदळवनांसारखीच या वृक्षांची मुळे खोडापासून जमिनीच्या दिशेने विस्तारलेली असतात. सदाहरित असणाऱ्या या वृक्षांची घनदाट मुळे ओल्या गाळयुक्त काळ्या मातीत उभे राहण्याकरिता मदत करतात. 'मायरिस्टिका स्वॅम्प''ची ही परिसंस्था भारतात केवळ कनार्टकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात, केरळमधील दक्षिणेकडील भागात आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रात ही परिसंस्था आढळून येणे महत्त्वाचे असून तिचे संवर्धन करणे आवश्यक होते.