(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nath Shashti Festival : पैठण नाथषष्ठीला यंदाही दोन दहीहंडी फुटणार; न्यायालयाने नाथ वंशजांची याचिका फेटाळली
Nath Shashti Festival : याप्रकरणी नाथ वंशजांच्या वतीने मधुसुदन रघुनाथराव गोसावी यांनी ॲड. तुंगार यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.
Nath Shashti Festival 2023: पैठणच्या नाथ मंदिराबाहेर श्री संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) विश्वस्त मंडळाच्या सार्वजनिकरित्या दहिहंडी फोडण्याच्या निर्णयाविरोधात नाथवंशजांकडून दाखल करण्यात आलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे (Bombay High Court Chhatrapati Sambhaji Nagar Bench) न्या. संदीपकुमार मोरे यांनी फेटाळली आहे. पैठणमध्ये सध्या नाथषष्ठीचा उत्सव (Nath Shashti Festival) सुरू असून, बुधवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या व मंदिरातही नाथवंशजांकडून दहिहंडी फोडण्यात येते. तर याप्रकरणी नाथवंशजांच्या वतीने मधुसुदन रघुनाथराव गोसावी यांनी ॲड. तुंगार यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. श्री. संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव सोळुंके यांनी खंडपीठात बाजू मांडली.
याबाबत ॲड. वसंतराव साळुंके यांनी सांगितले की, नाथवंशजांकडून सार्वजनिकरित्या दहिहंडी फोडण्याविरोधात मनाई हुकूम काढावा, अशी विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे दहिहंडी फोडण्याच्या संदर्भाने जुनाच वाद आहे. विश्वस्तांकडून आयोजित दहिहंडी फोडण्याचा उत्सव हा सहा लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो. यावेळी शासकीय अधिकारीही उपस्थित असतात. या उत्सवाला कुठलाही राजकीय रंग लावला जात नाही. शिवाय उत्सवासाठी कुठलीही वर्गणी आकारली जात नाही. 2020 पासून सार्वजनिकरित्या दहिहंडी फोडली जाते. सार्वजनिकरित्या दहिहंडी फोडण्याच्या उत्सवाला मनाई केल्यास सहा लाख वारकरी त्यापासून वंचित राहतील, अशी बाजू मांडण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने नाथ वंशजांची याचिका फेटाळली आहे.
काय आहे प्रकरण!
राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणारा नाथषष्ठी सोहळा दरवर्षी पैठण येथे साजरा होतो. नाथषष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठणमध्ये दाखल होतात. तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्याचा शेवटच्या दिवशी नाथ मंदिरात दहीहंडी फोडून या सोहळ्याचा समारोप केला जातो. मात्र मंदिराच्या आवारातील जागेचा प्रश्न लक्षात घेता दहीहंडीसाठी मोजक्याच लोकांना उपस्थिती राहता येते. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 पासून सार्वजनिकरीत्या मंदिराच्या बाहेर डोममध्ये मंदिर प्रशासनाकडून दुसरी दहिहंडी फोडली जाते. तर यावरच आक्षेप घेत नाथ वंशज यांनी एकच दहीहंडी फोडण्याची मागणी करणारी याचिका खंडपीठात दाखल केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :
नाथ षष्ठी सोहळ्यात दहीहंडी बाहेर फोडण्यास नाथ वंशजांचा विरोध, न्यायालयात आज होणार सुनावणी