(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News : महिलेचा विनयभंग करणाऱ्या 'एसीपी'ला निलंबित करा, अन्यथा औरंगाबाद शहर बंदची हाक; इम्तियाज जलील यांचा इशारा
Aurangabad News: औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
Aurangabad News: औरंगाबाद शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार तासांनी त्यांना जामीन मिळाला. मात्र असे असताना त्यांच्यावर पोलीस खात्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे विशाल ढुमे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात येत असून, असे न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिला आहे. जलील यांच्याकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
पोलीस दलातील एका मोठ्या अधिकाऱ्यानेच दारुच्या नशेत महिलेचा विनयभंग केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अनेक संघटनांनी ढुमे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान खासदार जलील यांनी मंगळवारी (17 जानेवारी) तक्रारदार महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून, ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
दरम्यान खासदार जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी संपर्क करुन घडलेल्या घटनेबाबत चर्चा केली आहे. सोबतच ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ढुमे यांना बुधवारपर्यंत (18 जानेवारी) निलंबित न केल्यास शुक्रवारी (20 जानेवारी) औरंगाबाद शहरात बंद पाळला जाणार असल्याचा इशारा जलील यांच्याकडून देण्यात आला आहे. सोबतच सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन हा बंद पाळतील. तसेच शहरातील क्रांतीचौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा जलील यांनी दिला आहे.
तपास अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवला
याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि पीडित महिलेचे समाजबांधव यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची मंगळवारी दुपारी भेट घेऊन ढुमेंच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. याप्रकरणी तपास अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवून दिला असल्याचे गुप्ता यांनी उपस्थितांना सांगितले. त्यामुळे यापुढील कारवाई निर्णय वरिष्ठांकडून घेतला जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
शहरात संतापाचे वातावरण!
आधीच औरंगाबाद शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात ज्यांच्यावर सुरक्षेतेची जबाबदारी आहेत तेच पोलीस महिलेचा विनयभंग करत असतील तर नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. त्यामुळे या घटनेने सध्या शहरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे. तर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
Aurangabad News : 'एसीपी'कडूनच महिलेची छेड, दीड तास सुरु होता राडा; पाहा औरंगाबादेत नेमकं काय घडलं