Raj Thackeray: राज ठाकरे आता फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी न लावण्याचा आदेश
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना 'मराठी हृदयसम्राट' या व्यतिरिक्त कोणतीही पदवी लावू नये असा आदेश देण्यात आला आहे.
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यापुढे आता केवळ 'मराठी हृदयसम्राट' ही पदवी लावावी, इतर कोणतीही पदवी लावण्याचा उद्योग करु नये असा आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या “मराठी हृदयसम्राट” या उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. कृपया या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे ही नम्र विनंती."
घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे बॅनर उभारण्यात आले होते. त्यावर 'हिंदू हृदयसम्राट' अशी उपाधी राज ठाकरेंच्या नावापुढे लावण्या आली होती. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या घटनेची गंभीर दखल मनसेच्या वतीनं घेण्यात आली आहे. घाटकोपरच्या घटनेनंतर मनसेच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
राज ठाकरेनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं शिवसेना सोडून 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावर या पक्षाने तब्बल 13 जागा जिंकल्या होत्या.
राज ठाकरेंचा प्रमुख अजेंडा हा मराठी हाच आहे. मध्यंतरी मनसे भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण भाजपने मनसेला मराठीच्या मुद्द्याचा त्याग करण्याची अट घातल्याचं समजतंय. याच मुद्द्यावरुन मनसेची आणि भाजपची होऊ घातलेली युती तुटल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याला आपला अजेंडा बनवणार अशी चर्चा सुरू होती. पण आजच्या पक्षाच्या या आदेशाने मराठीचा मुद्दा हाच पक्षासाठी महत्त्वाचा असून त्यावर आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुका लढवण्यात येतील असे संकेत देण्यात आले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha