छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळलं नाही असे ते म्हणाले.
Raj Thackeray : महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळलं नाही. सध्या जे वातावरण आहे हे आधीच कधी पाहिलं नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांवर देखील टीका केली. छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला असे म्हणत राज ठाकरेंनी पवारांवर टीका केली. ते डोंबिवलीत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं आज अनावरण करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला खुद्द शरद पवार गेले होते. यावरुन राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू
आमच्या शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे कल्याण भिवंडी या ठिकाणी बैठका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सर्व ठिकाणी चिखल झाला असल्याचे ठाकरे म्हणाले. लोकांनी नेत्यांना धडा शिकवला पाहिजे असेही ते म्हणाले. मी आधी बोलतो नंतर तुम्हाला पटते असेही राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत मी बोललो होतो. माझ्या काळ्या केसांवर तुम्ही जाऊ नका असेही ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचं राजकारण सुरु
मी मतदान केलं की फक्त टूग असा आवाज येतो. माझं मत मात्र कोणाला पडलं हे कळत नाही असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, गणपत गायवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले.
शिक्षकांना इलेक्शन ड्युटी देऊन बघा, राज ठाकरेंचा इशारा
यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर देखील टीका केली. निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो? निवडणुकीसाठी यंत्रणा उभी का करु शकत नाही? असा सवालही राज ठाकरेंनी केला. दरम्यान, शिक्षकांना इलेक्शन ड्युटी देऊन बघा. निवडणूक आयोग शिक्षकांवर कोणती कारवाई करतात ते बघतोच असा इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला.