रोहित पवारांच्या मतदारसंघात अजितदादांची बॅटिंग, पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Ajit Pawar on Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हयातील आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्याने योजना तत्त्वतः म्हणजे काय असा सवाल करत योजना मंजूर करायची असते अशी टीका अजित पवारांनी केली.
यावेळी अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांच्यावरही टीका केली. राम शिंदे यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला का नाकारले याचा विचार करा आणि आत्मपरीक्षण करा असा सल्ला अजित पवारांनी दिला. इतकेच नाही तर रोहित काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
अमरावती प्रकरणावर अजित पवारांचे भाष्य
अमरावती येथे आज सकाळपासूनच तणावाला सुरुवात झाली आहे. यावर बोलताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे समाजात दंगल पसरते आणि यात सामान्य माणसाचे नुकसान होते. त्यामुळे अफवा पसरवू नये असे अजित पवारांनी म्हटले.
अमरावतीत संचारबंदी
आज भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान पुन्हा हिंसाचार झाला. त्यानंतर आता अमरावतीत चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संबंधित बातमी:
Waseem Rizvi : त्रिपुरात जाळ, महाराष्ट्रात धूर, नवाब मलिकांनी थेट नाव घेतलेले वसीम रिझवी कोण?