Jyoti Waghmare : राज्यसभेची उमेदवारी जिजाऊंच्या हातच्या तलवारीची, सावित्रीमाईच्या हातच्या पाटीची अन् बाबासाहेबांच्या लेखणीची; ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया
Jyoti Waghmare Rajya Sabha : सोलापुरात अनवाणी चालणारी मुलगी दिल्लीत जाणार हे फक्त एकनाथ शिंदेंमुळेच शक्य झाल्याचं डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.

मुंबई : लहानपणापासून भाकरीसाठी संघर्ष केला, भुकेचे चटके सोसले अन् आता राज्यसभेची संधी मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. सोलापुरातील रस्त्यांवर अनवाणी चालणाऱ्या मुलीला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च संधी दिली आणि समस्त लाडक्या बहिणींना त्यांचा भाऊ पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं अशी पहिली प्रतिक्रिया डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी दिली.
ज्योती वाघमारे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका आता बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे. त्यानंतर ज्योती वाघमारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधत एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
भाकरीसाठी संघर्ष
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "मी लहानपणापासून भाकरीचा संघर्ष केला, भुकेचे चटके सोसलेत. हा दिवस येईल असं कधीही वाटलं नव्हतं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलायची संधी मिळाली त्यावेळी खूप झालं असं वाटलं होतं. भिमाच्या लेकीला, दलित मुलीला एकनाथ शिंदेंनी ही मोठी संधी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की,शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना हाच धर्म आणि शिवसेना हीच जात. आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राज्यसभेची संधी दिली."
सोलापूरच्या गल्लीत अनवाणी पायाने चालणारी मुलगी दिल्लीपर्यंत गेली. एका दलित मुलीला एकनाथ शिंदे यांनी संधी दिली त्यामुळे त्यांचे आभार असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या की, "ही माझी उमेदवारी नाही तर जिजाऊंच्या हातच्या तलवारीची आहे, सावित्री माईच्या हाताच्या पाटीची आहे, ही उमेदवारी बाबासाहेबांच्या हातच्या लेखनीची आहे. कंबर कसून कष्ट करणाऱ्या लाडक्या बहिणीची आहे. आज प्रत्येक लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदेंनी आश्वासित केलंय, की हा बंधू तुमच्या पाठीशी आहे."
पक्षातील नाराजी कशी दूर करणार?
शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, शायना एनसी यांच्यासह अनेकजण राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. परंतु कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली. त्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "मला या बाबतीतले राजकारण काहीही माहिती नाही. एकनाथ शिंदे यांनी मला दिलेल्या संधीचं सोनं मी करणार. सगळ्या ज्येष्ठांचं योगदान पक्षामध्ये आहे. पण कुठलाही वारसा नसलेली, घराण्याची परंपरा नसलेल्या एका गरीब दलित मुलीला शिंदेंनी पाठिंबा दिला."
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या




















