पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
गेल्या 20 दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत 50 टक्क्यांची वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
![पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश maharashtra Corona updates CM Uddhav Thackeray ordered to increase vaccination speed पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/26/1e1dd737fa3c4f77f9c91e9dbaf2d08f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असं राज्य सरकारच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. आज राज्याच्या मंत्रिमडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.
डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनच्या 27 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रातील एकूण संख्या 141 वर
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं (Omicron Cases In Maharashtra) काल (रविवारी) 31 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 27 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाण्यात दोन, ग्रामीण पुण्यात एक आणि अकोलामध्ये एका रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर मुंबईत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं बाधित होणाऱ्यांचा एकूण आकडा 74 वर पोहोचला आहे. तसेच, राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 141 वर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)