Maharashtra and Karnataka Border Dispute : महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल
Maharashtra and Karnataka Border Dispute : सीमा लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरु केल्यानंतर कर्नाटककडून नाटकी डाव सुरु झाला आहे.
Maharashtra and Karnataka Border Dispute : सीमा लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरु केल्यानंतर कर्नाटककडून नाटकी डाव सुरु झाला आहे. जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात सामील करण्यावरून विचार करणार असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. यानंतर राज्यात रणकंदन सुरु झाले आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी भाजप आणि कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवला. पवार म्हणाले, सीमा प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटकचा महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्ही एक इंचही जागा देणार नाही. आमचं रक्त सांडलं तरी चालेल, तेथील लोक तयार होणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, शिवरायांचा अपमान होत असताना भाजपची लोक काहीच बोलत नाहीत, महाराष्ट्र पेटून उठायला हवा होता. वास्तविक सीमाभागातील मराठी गाव आमची आहेत, त्यामुळे मुद्दा विचलित करण्याचा डाव कर्नाटक नाटक करून करत आहे. महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठीला न्याय द्यायचा असता, छत्रपतींना न्याय द्यायचा असता, तर सर्वोच्च न्यायालयात जाऊन, यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपने हा प्रश्न सोडवला असता, पण त्यांना भिजत घोंगडं ठेवायचं हे भाजपचं कटकारस्थान आहे.
महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही
दरम्यान, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेली गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधील आहे. आपण त्या गावांना पाणी देण्यासाठी आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.
राज्य सरकार कमजोर आणि हतबल;संजय राऊतांचा हल्लाबोल
सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra and Karnataka Border Dispute) निर्माण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या