(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीतील वडगावच्या शेतकऱ्याने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला!
तासगाव तालुक्यातील वडगाव इथल्या विजय शंकर देसाई या द्राक्षबागातदाराने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला आहे. नवीन जातीच्या वाणाचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न विजय देसाई करत आहेत.
सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्षबागातदार शेतकऱ्याने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला आहे. जास्त रोगप्रतिकार क्षमता, मोठी पाने आणि द्राक्षांची लांबी विक्रमी साडे सहा सेमी लांब इतकी आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये या द्राक्षाच्या नवीन वाणाची चर्चा आहे. या द्राक्षांना दर देखील चांगला मिळत आहे. या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला 451 रुपये दर मिळाला आहे. ही द्राक्षे अनेक देशात निर्यात केली जात असून ही द्राक्षे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय नवीन जातीच्या वाणाचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न देखील विजय देसाई करत आहेत.
विजय देसाई यांची मूळची चार एकर जमीन आहे. माळरानावरल्या जमिनीत सुपर जातीची द्राक्षबाग होती. आठ वर्षांपूर्वी त्याच बागेत एका झाडावर त्यांना वेगळ्या पद्धतीचा द्राक्षघड दिसला. त्यांनी त्या झाडाच्या काड्या काढून काही नवीन लागण केलेल्या बागेत भरल्या. ही द्राक्षांची रोगप्रतिकार शक्ती तसंच फळांची लांबीही जास्त आहे. दरम्यान या नवीन वाणाचं नाव अजून ठेवलं नाही.
त्यांचा माल बांगलादेश आणि मुंबईच्या बाजारात पाठवला. या द्राक्षांना व्यापाऱ्यांनी इतर द्राक्षांपेक्षा जास्तीचा दर दिला. बोटभर लांबीचं मणी आणि घड मोहात पाडत होता. दरवर्षी देसाई यांनी या झाडांच्या काड्या काढून क्षेत्र वाढवलं. सध्या त्यांच्याकडे 13 एकर द्राक्षबाग आहे. त्यात पावणेदोन एकर क्षेत्रावर या नवीन वाणाची द्राक्षे आहेत. गेली आठ वर्षे प्रयोग करुन त्यांनी हे क्षेत्र वाढवले आहे. मागील वर्षी ५०१ रुपयांनी त्यांचा माल व्यापाऱ्यांनी घेतला. तर सध्या दर नसलेल्या काळात त्यांच्या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीस 451 रुपये दर आला आहे.