Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
जायकवाडी प्रशासनाने बुधवारी पाच वाजता 2096 क्यूसेकने विसर्गात वाढ केली होती. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण 11528 क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला होता.
Beed: मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरु आहे. परिणामी गोदावरी नदीपात्रात पाणी वाढलं आहे. हेच पाणी सध्या बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भवनपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान राक्षस भवन येथील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. अशातच जायकवाडी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे.
जायकवाडी धरणाची 18 दरवाजे उघडली
धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणाची १८ दरवाजे महिनाभरात दुसऱ्यांना उघडण्यात आली. यामुळे जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग गोदापात्रात सुरु असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बीडचे राक्षसभवन येथे धरणाचे पाणी शिरले असून या भागातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
मंदिरं गेली पाण्याखाली..
जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु असल्यानं गुळज येथील बंधाऱ्यातून पाणी गेवराईकडे सोडण्यात आले आहे. परिणामी राक्षस भवन येथील मंदिर पाण्यात गेल्याचं दिसून आलं. येत्या दोन दिवसातील पावसाची शक्यता लक्षात घेता तहसील प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
बीड जिल्ह्यातील धरणे तुडुंब
बीड जिल्ह्यातील धरणं आता भरण्याच्या मार्गावर असून मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. माजलगाव धरणातही ६४.९१ टक्के साठा झाल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं. जायकवाडी धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला असून ९९.५० टक्क्यांवर धरणसाठा झाला आहे.
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी प्रशासनाने बुधवारी पाच वाजता 2096 क्यूसेकने विसर्गात वाढ केली होती. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण 11528 क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. बुधवारी आधी सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
किती भरले जायकवाडी धरण?
जायकवाडी धरण 99.78 टक्क्यांनी भरले असून जायकवाडीत पाण्याची पातळी 1521 फुटांवर गेली आहे. धरणाच्या वरील भागात तसेच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. दरम्यान बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहा दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला होता.