Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Devendra Fadnavis on Ajit Pawar CM Post statement: 'मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण मी पुढेच जात नाही. मला संधी मिळत नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण पक्षाने ती गमावली, या पवारांच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मुख्यमंत्री पदावरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, मात्र, अनेकदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) आत्तापर्यंत एकदाही मुख्यमंत्री पद मिळालं नाही. मात्र, अनेकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबतची आपली महत्तकांक्षा बोलून दाखवली आहे. काल(बुधवारी) देखील एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मी पुढेच जात नाही. मला संधी मिळत नाहीये. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण पक्षाने ती गमावली, त्यांच्या या वक्तव्यावर आज त्याच कार्यक्रमामध्ये राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या पक्षाचा एक आमदार आहे, त्यालाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल.
महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, याचे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात पण मी महाराष्ट्र भाजपचा नेता आहे. आमच्या पक्षात मुख्यमंत्री कोण होणार हे संसदीय मंडळ ठरवते. असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या बाबत उत्तर दिलं आहे. तर सर्व पक्षांना मुख्यमंत्री पदाला संधी देण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, असे काही होत नाही.
अजित पवार काय म्हणाले होते?
नितीशकुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे. मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "मुख्यमंत्री बनायचं आहे. पण आमची गाडी तिथेच उपमुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, त्याला काय करायचं. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण संधी मिळत नाही.राष्ट्रवादीला 2004 मध्ये एकदा संधी मिळाली. पण पक्षनेतृत्वाने ती संधी गमावली. जो कोणी खुर्चीवर बसतो त्याला ती खुर्ची आवडते. त्यानुसार प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे काम आहे. पण ही जागा महाराष्ट्राच्या एकाच मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र 145 जागांचा आकडा जो गाठेल तोच मुख्यमंत्री होईल. माझी महत्त्वाकांक्षा काय आहे, मी आत्ताच सांगणार नाही. महायुतीच्या रूपाने पुन्हा सत्तेत येण्याचे आमचे ध्येय आहे, असंही ते म्हणाले होते.
'दुसऱ्याचं सरकार आलं तर...'
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा अजित पवारांसाठी करा किंवा मरोचा क्षण आहे का? यावर ते म्हणाले की, मला तसे वाटत नाही. छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही सरकार चालवत आहोत. आम्ही काम केले, योजना आणल्या. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. मंत्रिमंडळात 30 वर्षांपासून प्रलंबित असलेले वाधवन बंदर त्यांनी यापूर्वीच पास केले आहे. केंद्रात एनडीएचे सरकार आले, तर महाराष्ट्रातही आले तर त्याचा फायदा होईल. यावेळेसही आंध्र आणि बिहारला अर्थसंकल्पात जास्त पैसा मिळाला.त्यानुसार महाराष्ट्रालाही अधिक पैसा मिळायला हवा. दुसऱ्याचे सरकार आले तर ते म्हणतील केंद्र आमचे ऐकत नाही, मग आम्ही काय करायचे? मात्र सरकारमध्ये राहिल्यास केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतो, असं म्हणत त्यांनी पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार येण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यास अमित शहांनी सांगितले होते का? त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मला कोणी सांगितले नव्हते. मी कोणाचेच ऐकत नाही. निकाल आल्यावर मला समजले की ही माझी चूक होती. शरद पवार यांच्या भेटीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी जुलैमध्ये सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर दिवाळी आली, त्याच काळात आमची भेट झाली. एकजुटीने दिवाळी साजरी झाली. घरात राजकारण नाही. ते (शरद पवार) माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय सांगू? मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत नाही, असंही ते म्हणाले.