Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी
Pandharpur Vitthal Temple News : विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजा वाटपात गैरप्रकार होत असल्याची सातत्याने तक्रार होत होती. त्याला आता आळा बसणार आहे.
सोलापूर: अखेर 1 ऑक्टोबर पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा याची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर पासून ऑनलाईन नोंदणी होणार असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र संगणक प्रणाली विकसित करण्यास उशीर झाल्याने आता एक महिन्यानंतर म्हणजे 1 ऑक्टोबरपासून भाविकांना या सर्व पूजेचे ऑनलाईन बुकींग करता येणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजा वाटपात कायम गैरप्रकार होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती. याची अनेक उदाहरणे समोर येत असताना मंदिर प्रशासनाने या गैरप्रकारला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी पाऊल उचललं आहे. देवाच्या सर्व पूजा थेट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याची संगणक प्रणाली आणल्याने आता यात घोटाळे करणाऱ्यांना काही गैरप्रकार करता येणार नाही.
सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या20 ऑगस्ट रोजीच्या मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले असून आता भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
आता 7 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.
याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
ही बातमी वाचा: