जळगावात दोन बसच्या मध्ये चिरडून एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
बस रिव्हर्स घेत असलेल्या चालकाला मार्गदर्शन करताना बसचा वेग वाढला. मात्र आधीच दुसरी बस मागे उभी असल्याने भिकन लिंगायत यांना बचावासाठी वेळ मिळाला नाही आणि ते दोन बसच्या मध्ये चिरडले.
जळगाव : दोन बसमध्ये चिरडलं गेल्याने एका एसटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव शहरातील एसटी वर्कशॉपमध्ये काल (14 जून) दुपारी ही घडली. येत्या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होण्यापूर्वीच भिकन लिंगायत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे
एसटी विभागात चार्जमन पदावर कार्यरत असलेले भिकन लिंगायत गेल्या दहा दिवसांपासून रजेवर होते. रजा संपल्यानंतर ते कामावर हजर झाले होते. कामावर असतानाच बस रिव्हर्स घेत असलेल्या बस चालकाला मार्गदर्शन करत होते. याच वेळी बसचा वेग वाढला आणि बस वेगाने मागे आली. यावेळी भिकन लिंगायत यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आधीच दुसरी बस मागे उभी असल्याने त्यांना आपला बचाव करण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि काही कळायच्या आत ते दोन्ही बसच्या मध्ये दाबले गेले.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. एसटी वर्कशॉपमध्ये काल घडलेल्या या घटनेने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भिकन लिंगायत यांच्या मृत्यू प्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परिवहन विभागामार्फत या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. यात कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच नियमानुसार मृताच्या वारसाला नोकरी देण्यात येणार असल्याचं एसटी मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे.