राज्यातील सत्ताकोंडी 17 नोव्हेंबरपूर्वी फुटणार? शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची येत्या दोन दिवसात भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहे. महाशिवआघाडीच्या आजच्या बैठकीत अंतिम मसुदा तयार झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक होणार असल्याची माहिती आहे. तर 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 17 नोव्हेंबरआधी सत्ता कोंडी फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची येत्या दोन दिवसात भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. 17 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. यादिवशी राज्यात सत्ता स्थापन झाल्यास ही बाळासाहेबांना शिवसेनेकडून आदरांजली असणार आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरआधी सत्तास्थानप करण्यासाठी शिवसेनेकडून तरी प्रयत्न केला जाऊ शकतो.
शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून तो अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारणी वेगवेगळी आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्या 'महाशिवआघाडी' जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, यासाठी मसुदा तयार करण्याची प्रकिया सुरु आहे. या मसुद्याला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर सत्तेचा पेच सुटण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते.
शिवसेना-भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी युती झाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. भाजपने अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. तर शिवसेनेला असा शब्द दिल्या नसल्याने मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड होणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला.
अखेर राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोठ्या पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. मात्र कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करु न शकल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर अखेर 12 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
VIDEO | Special Report | महाशिवआघाडी कोणत्या मुद्द्यांवर होणार?