सर्व व्यवहार ऑनलाईन, मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन का? पंकजा मुंडेंचा सवाल
शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडवण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांना मनासारख्या नेमणुका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
बीड : कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा सध्या बंद आहेत. शिवाय सरकार सर्व व्यवहार ऑनलाईन करत आहे. मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईनच का? हा घाट कुणासाठी घातला जातोय. असा थेट सवाल करत याचा जाब विचारण्यासाठी तयार राहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी आज मराठवाड्यातील शिक्षकांशी संवाद साधताना केले. सरकारच्या ऑफलाईन बदलीच्या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या शिक्षकांना या आवाहनामुळे बळ मिळाले आहे. उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी सरकारच्या ऑफलाईन धोरणाचा या संवादात तीव्र विरोध केलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्याशी पंकजा मुंडे यांनी आज ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुरेश धस, आमदार तानाजी मुटकूळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार सौतोष दानवे, आमदार मेघनाताई बोर्डीकर हे मराठवाड्यातील आमदार तसेच माजी आमदार गोविंद केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सरकारच्या हालचाली; नवे सॉफ्टवेअर तयार करण्याचे आदेश
शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडवण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांना मनासारख्या नेमणुका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी .तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे, असे त्या म्हणाल्या. आम्ही सरकारमध्ये असताना सचिव, सर्व संबंधित अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांना विश्वासात घेऊन ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे सर्व सामान्य शिक्षक, ज्यांना कुणी वाली नव्हतं. ज्यांचा कुठला वशीला नव्हता, अशांना भ्रष्टाचारमुक्त धोरणाचा लाभ झाला. परंतु विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय? असा सवाल यावेळी पंकजा मुंडे यांनी केलाय.
जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार
सरकारचा हा निर्णय हास्यापद असून 'खाली डोकं वर पाय' असा आहे, असे त्या म्हणाल्या. बदल्या ऑनलाईनच असाव्यात अशी सगळ्या शिक्षकांची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वतः आग्रही आहे. माझे आजोबा तसेच मामा प्रमोद महाजन हे तर स्वतः शिक्षक होते आणि गुरू म्हणून माझे पिता मुंडे साहेब हे देखील याच वातावरणात वाढले. त्यामुळे या लढाईत मी तुमच्यासोबत आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदन दिली आहेत. सरकारने बैठक बोलवावी आणि हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा हा निर्णय बदलण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागेल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
Pankaja Munde | राज्य सरकारने शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांवर पुन्हा विचार करावा : पंकजा मुंडे