जळगाव जिल्हातील 'त्या' पाच कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू? आरोग्य यंत्रणेने आरोप नाकारले
चोपडा उप जिल्हा रुग्णालयातील पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी झाला असल्याची बातमी आहे. आरोग्य प्रशासनाने मात्र हे आरोप नाकारले आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय सूत्रांनी मात्र पाच जणांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं असलं तरी ते वयोवृद्ध असल्याने आणि गंभीरतेने मरण पावल्याच म्हटलं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर चोपडा रुग्णालयातील रुग्णांसाठी असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा संपला असल्याची प्रतिक्रिया रुग्ण देत असल्याची एक क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आल्याच पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसागणिक वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि त्यावर उपचार करणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरली आहे. अशातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा जिल्हा उप रुग्णालयात शनिवारी पाच रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरा पाठोपाठ चोपडा तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्ण चोपडा जिल्हा उप रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र या ठिकाणी असलेली बेडची क्षमता आणि रुग्ण संख्या यात मोठी तफावत असल्याने आरोग्य यंत्रणेवर त्याचा मोठा ताण पडत आहे.
अशातच काल रात्रीच्या सुमारास रुग्णांना लावण्यात आलेला ऑक्सिजन संपला असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. शनिवारी रात्री मयत झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाल्याच बोललं जातं आहे. आरोग्य यंत्रणेने मात्र काही वेळा साठी ऑक्सिजन संपला असल्याचं मान्य केले आहे मात्र हे मृत्यू ऑक्सिजन संपण्याच्या पूर्वीच झालेले होते, शिवाय हे रुग्ण वयोवृद्ध आणि गंभीर अवस्थेत दाखल झालेले असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच म्हटलं आहे.
आरोग्य यंत्रणने सोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लिपवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करीत, ऑक्सिजन अभावी रुग्ण मयत झाल्याच नाकारलं आहे.
आपल्या घराजवळील एका रुग्णाचा मृत्यू जिल्हा उप रुग्णालयत झाल्याची माहिती आपल्याला मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गेलो असता रुग्णांचा ऑक्सिजन संपल्याचे लक्षात आल्याच आपल्याला पाहायला मिळालं होतं. काहींना ऑक्सिजन यंत्रणा लावण्यात आलेली असली तरी ऑक्सिजन मात्र बंद असल्याचं आपल्या निदर्शनास आले होते. यातच काही जण दगावले असल्याने आपण या घटनेचा व्हिडीओ काढून तो वायरल केला असल्याची प्रतिक्रिया चेतन कानडे या तरुणाने दिली आहे
महत्वाच्या बातम्या :
- मालाडच्या ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांच्या बेड्या, गुजरातमधून केली अटक
- सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात 33 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, तर 43 प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह
- Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा आज 122 वा दिवस, दिल्लीच्या सीमेवर आज होणार होलिका दहन






















