एक्स्प्लोर
EXCLUSIVE : केबीसीची सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणची अटकेनंतर पहिलीच मुलाखत
नाशिक : अल्प काळात लोकांना श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून केबीसीचा मायाजाल रचणारा भाऊसाहेब चव्हाण पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. केबीसी या कंपनीमार्फत भाऊसाहेब चव्हाणनं महाराष्ट्रभर अंदाजे 10 हजार कोटींचा चूना लावल्याचा त्याचावर आरोप आहे.
विविध शहरांमध्ये चव्हाणवर गुंतवणूकादारांना फसवल्याचे गुन्हेही दाखल झाले आहेत. सिंगापूरहून भाऊसाहेब चव्हाण भारतात परतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटकेत घेतलं आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
भाऊसाहेब चव्हाण आपल्या बाजून काय स्पष्टीकरण देतो आहे? गुंतवणूकदारांना केबीसीमुळे आत्महत्या करण्याची वेळ का आली? गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय? अशा सगळ्या प्रश्नांचा जाब आम्ही भाऊसाहेब चव्हाणला विचारला. एक्स्क्लुझिव्ह मुलाखत:
प्रश्न : केबीसी नेमकं काय आहे?
भाऊसाहेब चव्हाण : केबीसी हा एक शॉर्ट फॉर्म आहे. नाईट बिलियनर्स ऑफ चेंबर्स या कंपनीचा. केबीसी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. जसं तुम्ही बोललात की, 10 हजार कोटी, असं काहीही नाहीय. माझ्या कंपनीमध्ये जवळजवळ 4 वर्षांपर्यंत हा बिझिनेस रेग्युलर चालू होता. ज्यांना ज्या ज्या तारखा दिल्या जायच्या, त्या त्या तारखांना पैसे भेटत होते. याच्यामध्ये कोणतीही अशी फसवणूक नाहीय किंवा कोणताही फ्रॉड नाहीय.
प्रश्न : मग नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण?
भाऊसाहेब : हे सगळं काय आहे की, आमचा मल्टिलेव्हल मार्केटिंगमध्ये बिझिनेस चाललेला होता. आणि मल्टिलेव्हल मार्केटिंगमध्ये आम्ही जवळजवळ 4 वर्षांपासून रेग्युलर बिझनेस करत होतो. 5 जून 2010 पासून ते अगदी 7 मार्च 2014 पर्यंत. त्याच्यानंतर आमच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने रेड टाकून हे सर्व सीज केलं आणि नंतर मी लोकांना पैसे देऊ शकलो नाही. त्यामुळे 3 ते 4 महिन्यानंतर लोकांच्या तक्रारी झाल्यात आणि नंतर हे गुन्हे नोंदवले गेले.
प्रश्न : नेमकी किती इन्व्हेस्टमेंट लोकांनी तुमच्या कंपनीत केली आहे?
भाऊसाहेब : लोकांची इनव्हेसमेंट होऊन आणि त्यातून लोकांचे पैसे परत गेलेले आहेत. पण माझ्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2014 ची जी आकडेवारी मी काढलेली आहे, त्याच्यानुसार मला फक्त 160 कोटी रुपये देणं लागतं. आणि आतापर्यंत माझी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, लॉकर वगैरे सर्व, आम्ही भारतातून कोणत्याही देशात घेऊन गेलेलो नाही. आणि आम्ही पळूनही गेलेलो नव्हतो. जे आमच्यावर ब्लेम लावले जात होते आजपर्यंत की, पळून गेलो. तर नाही. मी 10 जून 2014 ला भारतात येऊन, 18 जून 2014 ला कोर्टाच्या आदेशाने, कोर्टाची परमिशन घेऊन, माझी मुलं परदेशी शिकायला असल्या कारणाने आम्ही सहकुटुंब परदेशामध्ये राहत होतो.
प्रश्न : नेमकं कुठे राहत होतात तुम्ही?
भाऊसाहेब : सिंगापूर येथे.
प्रश्न : किती दिवस राहिलात?
भाऊसाहेब : तीन वर्षे.
प्रश्न : किती लोकांनी तुमच्याकडे पैसे इनव्हेस्ट केलेत. आकडा काय आहे तो?
भाऊसाहेब : आकडा नाहीय. पण जे देणं लागतंय, ते मी तुम्हाला सांगतो. 160 कोटी रुपये लोकांचं घेणं माझ्याकडे बाकी आहे. त्यापैकी सर्व प्रॉपर्टी आणि हे सर्व मिळून माझी जवळजवळ मार्केटव्हॅल्यू 120 कोटींच्या पुढे आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जमा केले आहेत. त्याच्यातून सर्व रक्कम लोकांना परत करायला मी केव्हाही तयार आहे. ज्याप्रमाणे कोर्ट आणि अधिकारी लोक, कारण अजून आमचा अजून काही तपास बाकी आहे. अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत. तिथला तपास पूर्ण झाल्यानंतर, मी कोर्टाला विनंती करुन लोकांना लवकरात लवकर देण्यासाठी मी कोर्टाकडून परमिशन घेईन.
प्रश्न : तुम्हाला माहितंय का, तुमच्या या केबीसी घोटाळ्यामुळे लोकांना आत्महत्या करावी लागली आहे?
भाऊसाहेब : बघा कसंय.... मी पण पेपर वगैरे वाचलेत. तुमचे न्यूज चॅनेल्स वगैरे पाहिलेत. त्यामधून मला समजलं की, लोकांनी आत्महत्या केल्या. नाशिकला अचानक गुन्हा घडल्यामुळे दोन जणांची आत्महत्या झालेली आहे, बाकीचे हार्ट अटॅकने काही लोक गेलेली आहेत, हे घडायला नको होतं. कारण जेव्हा 4 वर्षांमध्ये माझी कंपनी चालू होती, त्या 4 वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात, जिथे जिथे कंपनी चालू होती, तिथे तिथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसावी.
प्रश्न : कुणी मंगळसूत्र विकलंय, स्वत:चं सर्वस्व विकलंय, कुणी पेन्शनचे पैसे दिलेत, या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतंय?
भाऊसाहेब : वाईट याचं वाटतंय की, माझी कंपनी समजा बंद केली नसती आणि सर्व जर सीज आधी केलं नसतं, मला जर काही टाईम पिरियड दिला असता की, लोकांचे सर्व पैसे परत करुन टाका, तर ते नक्कीच केलं असतं. पण आधी कंपनी सीज झाल्यामुळे सर्व माझ्या हातात काहीच नाही राहिल्यामुळे आज माझ्यामुळे सर्व लोकांना जो त्रास होतोय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझा कुणालाही फसवण्याचा दृष्टीकोन नव्हता.
प्रश्न : मग तुम्ही पैसे परत कसे करणार?
भाऊसाहेब : जे आता माझे बँक बॅलन्स, लॉकर, कॅश बॅलन्स, प्रॉपर्टी याच्यातून जे जमा झालेलं आहे, त्याच्यातून कोर्टाला विनंती करुन लोकांना पैसे परत करेन.
प्रश्न : तुमच्या घरच्या लोकांनाही अटक झालीय. ते सर्व सहभागी आहेत यामध्ये?
भाऊसाहेब : हा खूप आघात झालेला आहे. माझ्या कुटुंबीयांवरही. माझे नातेवाईक माझ्यापासून दुरावलेले आहेत. माझ्यावर एकप्रकारे कट रचला गेला आहे, असं मला वाटतं. याची शहानिशा ज्या अधिकाऱ्यांनी असं केलेलं असेल, ते बघतील. पण माझा कुणावरही ब्लेम नाही या गोष्टीच्या संदर्भात.
प्रश्न : कोण आहेत गुन्हेगार केबीसीच्या लोकांचे सर्व पैसे गुंतवणारे?
भाऊसाहेब : मी या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत.
प्रश्न : तुम्ही औरंगाबादमधील मेळाव्यात म्हणाला होतात की, महाराष्ट्रीत सर्व गरीबांना श्रीमंत करायचंय.
भाऊसाहेब : मी क्लबर रिसॉर्टच्या स्थापना केल्या होत्या. माझा घोटी पिंपळगाव मोर येथे, क्लब रिसॉर्टचं काम सुरु आहे. जवळजवळ 70 टक्के काम झालं आहे. तेथे गेल्या दोन वर्षांपासून काम बंद पडलेले आहे. तसेच चांदवड येथे साडे बेचाळीस एकरची जमीन आम्ही घेतलेली आहे. ती माझ्या म्हणजे कंपनीच्याच नावाने आहे. तिथेही क्लब रिसॉर्टचा प्रोजेक्ट होता. या माध्यामातून लोकांना श्रीमंत करण्याचा विचार होता.
प्रश्न : लोकांकडून पैसे घ्यायाचात, त्याचं नेमकं काय व्हायचं, त्यांना परत कधी द्यायचं, काय प्लॅनिंग होतं?
भाऊसाहेब : ते माझ्या बिझनेसचं गुपित आहे. ते मी उघड नाही करु शकत.
प्रश्न : लोकांचा पैसा आहे, तो त्यांना परत पाहिजे, काय कराल?
भाऊसाहेब : सर्व लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो तसाच ठेवावाव. सर्व पैसे, जे माझे बँक बॅलन्स, प्रॉपर्टी जमा झालेले आहे, त्यातून निश्चितच परत मिळतील, असा माझ्यावर विश्वास ठेवा.
प्रश्न : परदेशात पळून गेला होतात, कशासाठी आलात?
भाऊसाहेब : परदेशातला व्हिसा संपला होता. मी परदेशात आयसीए ऑफिसला गेल्यानंतर त्यांना विनंती केली की, माझ्या व्हिसाचं पुढे नूतनीकरण व्हावं. पण इंडिया गव्हर्नमेंटने रेड कॉर्नर नोटीस काढल्याने माझ्या व्हिसाचं नूतनीकरण झालं नाही. म्हणून मी स्वत:हून भारतात परत आलो. 3
प्रश्न : तुम्हाल अटक केली पोलिसांनी?
भाऊसाहेब : हो. ती एअरपोर्टला अटक झाली.
प्रश्न : तुमच्या पत्नीवरही तुमच्याएवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. त्या तुमच्याएवढ्याच जबाबदार आहेत, या सर्वाला?ट
भाऊसाहेब : नाही. त्या फक्त नॉमिनल डायरेक्टर आहेत. त्यांचं शिक्षण केवळ सातवी झालं आहे. त्या कोणत्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीत. संचालक असल्यामुळे त्यांच्यावर आरोप लागलेले आहेत.
प्रश्न : ज्या इन्व्हेस्टर्सनी मंगळसूत्र किंवा अन्य मार्गातून पैसे गुंतवलेत, त्यांना काय सांगायचंय?
भाऊसाहेब : लोकांना माझी एकच कळकळीची विनंती. सर्वांनी संयम ठेवावा. हा तपास आणि कोर्ट मॅटर असल्यामुळे याला थोडा वेळ लागेल. प्रत्येकाचे पैसे मिळतील, याची मी ग्वाही देतो.
VIDEO : भाऊसाहेब चव्हाणशी एक्स्क्लुझिव्ह बातचित :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement