(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : तर ठाकरेंना नव्या पक्षाची नोंदणी करून नवे चिन्ह घ्यावे लागेल
Maharashtra Politics : शिवसेनेची आण बाण आणि शान….आक्रमक मुद्रेचा वाघ आणि धनुष्य बाण…या दोन्हींवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर नियंत्रण मिळवण्याची धडपड सुरू आहे. ही लढाई शिवसेनेचे चिन्ह….धनुष्य बाण कोणाचा इथपर्यंत आली आहे. शिंदे गटाचा दावा आहे….पक्षाचे खासदार आणि आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि त्याच्या चिन्ह शिंदे गटाचेच आहे. या विरोधात शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. जर उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसेल तर ठाकरेंना नव्या पक्षाची नोंदणी करून नवे चिन्ह घ्यावे लागेल. .
शिवसेनेची आण बाण आणि शान….आक्रमक मुद्रेचा वाघ आणि धनुष्य बाण…या दोन्हींवर शिंदे गटाने दावा केला आहे. 2019 साली शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. त्यापैकी एकाचे निधन झाल्याने सध्या आमदारांची संख्या 55 आहे. 4 जुलै रोजी झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गटाच्या बाजूने 40 आमदारांनी मतदान केले. ठाणे मनपातीले 67 पैकी 66 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. आहेत. डोंबिवली मनपातील 55 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. नवी मुंबईतील 32 नगरसेवकांनी शिंदे गटाचा हात पकडला आहे. काल 12 खासदार शिंदे गटात सामिल झाले..त्यानंतरच काल रात्री शिंदे गटाने धनुष्य बाणावर दावा केला.
पक्षात जेव्हा दोन गट पडतात तेव्हा निवडणूक आयोग पक्षातील पदाधिकाऱ्यांची संख्या, आमदार, खासदारांच्या संख्येचा विचार करून निर्णय घेते. आयोग हे पाहील की शिंदे सोबत किती पदाधिकारी आहेत. त्यानंतर खासदार आणि आमदारांच्या आधारावर बहुमत पाहिले जाईल. यासाठी आमदार आणि खासदारांकडून आयोग प्रतिज्ञापत्र देखील करून घेईल. आयोग दोन्ही गटांचे म्हणणे, कागदपत्रे आणि संख्या बळाच्या आधारावर कोणत्या तरी एका गटाला मान्यता देईल. त्या गटाला पक्षाचे मुळ नाव आणि निवडणूक चिन्ह मिळेल.
शिवसेनेला धनुष्य बाण मिळून चार दशके झाली. धनुष्य बाण घराघरात पोंहचला. पण जर निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत नाही हे सिध्द झाले तर ठाकरेंना नव्या पक्षाची नोंदणी करून नवे चिन्ह घ्यावे लागेल. .जर दोन्ही गट आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत तर आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह जप्त करू शकते. या पैकी कांहीही झाले तर उध्दव ठाकरे यांचे मोठे राजकीय नुकसान असेल…