शिंदे- फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित महाराष्ट्र दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यावर लक्ष
उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांचा दौरा निघणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आता लवकरच होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसोबत बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, त्यामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेमधल्या अभूतपूर्व उठावानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच राज्य दौरा असणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत, यामध्ये मुंबईचा समावेश आहे. भाजपसह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.
राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत,अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'जय श्रीराम' चा नारा
दरम्यान, राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर अयोध्या दौऱ्याचा विषय मागे पडला होता. मात्र, आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.