(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांचे मराठवाड्यातील आमदारांना आदेश, बैठकीत 'या' महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. काल रात्री (5 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली.
Devendra Fadnavis Bjp Mla Meeting News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपने देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काल रात्री (5 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली.
विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आणदारांना आदेश
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींसह प्रलंबित विकासकामे यावर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता. यामुळं आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिले आहेत. तसेच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे असं देखील आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपची सकारात्मक भूमिका : संभाजी पाटील निलंगेकर
मराठवाड्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये काही कामं काही कारणास्तव प्रलंबित आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या कामांना अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील कामाला गती कशी देता येईल. या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे निलंगेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा झाली. मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मराठवाड्याला न्याय कसा देता येईल अशी त्यांनी भूमिका घेतल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. निवडणुकीला जर डोळ्यासमोर ठेवलं तर विकासात्मक प्रश्न जे असतात ते प्रश्न मार्गी लावायचे असतात असेही ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीने अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका ठेवली आहे. विरोधी पक्षांच्या वतीने जाणीवपूर्वक हा प्रश्न कसा भिजत ठेवता येईल अशी विरोधी पक्षाची भूमिका असल्याचे निलंगेकर म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला आहे. त्यामुळं भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आधी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळं सध्या विविध विषयांवर चर्चा, बैठका सुरु असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या: