Amol Kolhe : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु होताच खासदार अमोल कोल्हेंचा व्यासपीठावरून काढता पाय!
Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वढू बुद्रुक (जि. पुणे) : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज (2 मार्च) पार पडला. याच विकास आराखड्याच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडले. मात्र, या कार्यक्रमामध्ये नाराजीनाट्याचा अंक रंगला. खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. एबीपी माझाशी बोलताना कोल्हे यांनी नाराजीचे कारण स्पष्ट केले.
फक्त राजकीय पक्षांचे झेंडे, कोल्हेंची टीका
ते म्हणाले की, मुळात या कार्यक्रमासाठी मला काल रात्री निमंत्रण मिळाले. कार्यक्रमामधील फ्लेक्सवर संभाजीराजेंना स्थान देण्यात आलेलं नाही. फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत. कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा त्यांचा अपमान असल्याची टीका कोल्हे यांनी केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा विचार जिवंत राहणार आहे. सुरवातीच्या काळामध्ये अजित पवार सोबत नसताना हा विकास आरखडा मंजूर केला गेला. स्मारकाचे काम पूर्ण व्हावं यासाठी अजित पवार आमच्या सोबत आहेत. ते म्हणाले की, दादा मी नेहमी उचित सल्ला देतो, जे एकतात त्यांचं कल्याण होतं.
अजित पवारांकडून बोलताना चूक, फडणवीसांनी लक्षात आणून दिलं
तत्पूर्वी, अजित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना मोठी चूक केली. अजित पवार यांनी संभाजीराजेंनी एकही निवडणूक हरलेली नाही, असा उल्लेख केला. चूक लक्षात येताच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दुरुस्त करण्यास सांगितले. यानंतर अजित पवार यांनी हात जोडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुढे देखील आमच्याकडून काही चुका झाल्या तर आमच्या लक्षात आणून द्या, असे म्हणाले.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे चांगले स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा होती त्यानुसार हे स्मारक होईल. 397 कोटींचा विकास आरखडा मंजूर केला असून सर्व सोयीनियुक्त स्मारक उभं केलं जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करत भाषणाला सुरूवात केली. हे गौरव स्मारक होण्यासाठी आम्हाला नवीन सरकार स्थापन करावं लागल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समाधी स्थळ आणि बलिदान स्थळ ही महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बांधलं जाईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाभरणी केली, तर संभाजी महाराजांनी कळस चाढवल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
























