जालन्यात परतूर मंठा वॉटर ग्रीड योजनेचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
'मराठवाडा वॉटर ग्रीड'साठी जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव या 11 धरणांना लूप पद्धतीने जोडण्यात येणार आहे.

जालना: मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर उपाय म्हणून दुष्काळ मुक्तीच्या संकल्पनेअंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मांडण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. जालना जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या परतूरा मंठा वॉटर ग्रीड योजनेच्या मदतीने तब्बल 173 गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता प्रतिदिन 320 लाख लिटर आहे, तर यासाठी आलेला खर्च 248.69 कोटी आहे. पुढील 20 वर्षांच्या लोकसंख्येच्या अंदाजाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. याचं काम स्काडा यंत्रमाद्वारे ऑटोमॅटिक होणार असून त्याचं नियंत्रण हे एकाच ठिकाणी असेल.
'मराठवाडा वॉटर ग्रीड'साठी जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव ही 11 धरणं लूप पद्धतीने जोडण्यात येतील त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यांपर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना म्हणून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. त्यासाठी पर्शम पायलट प्रोजेक्टच्या स्वरुपात परतुर मंठी येथे या योजनेची सुरुवात करण्यात आली. गेली दोन वर्ष जालन्यातील परतुरमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. अवघ्या दोन वर्षातच याचं काम पूर्ण झाल्याने हा विक्रमी कालावधी असल्याचं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं म्हणणं आहे.
अनियमितपणे पडणारा पाऊस, जलपातळीत वारंवार होणारी घट, पाणीसाठ्याचं कमी होत असलेलं प्रमाण, टॅंकर्सच्या मागणीत होणारी वाढ त्याचप्रमाणे 2016 साली लातूर शहरात रेल्वेद्वारे करण्यात आलेला पाणीपुरवठा यासर्व अडचणी लक्षात घेता मराठवाड्यात वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. आज महाजनादेश यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्र दौरा करत आहेत, त्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या जलशुद्धीकरण केंद्राचे रिमोटद्वारे ई-उदघाटन केले.























