एक्स्प्लोर
सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत महाबीजकडून वाढ, शेतकऱ्यांमध्ये संताप
पेरणीच्या ऐन तोंडावरच सरकारच्या अधीन असणाऱ्या महाबीज महामंडळाकडून सोयाबीन बियाण्यांची झालेली ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे.
बीड : कोरोनाच्या या महासंकटामध्ये केवळ राज्यच नाही तर देशभरातील सगळ्याच क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण पाहायला मिळतंय. शेती क्षेत्रावर तर कोरोनाचा वाईट परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयाबीनचे बियाण्यांच्या किमतींमध्ये महाबीजने 30 किलोच्या बॅगमागे तब्बल 360 रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजेच क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ केल्याने शेतकाऱ्यातून संताप व्यक्त केला जातं आहे.
राज्यामध्ये जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला जातो. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याकारणाने आधीच शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. असे असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी आहे.
महाबीज हे महामंडळ सरकारच्या आधीन राहून काम करतं. मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालं होतं. त्याचा मोठा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला आहे. बियाण्यांसाठी वापर केले जाणारे सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे असते आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचे महाबीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागच्या वर्षी शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाण्यासाठी दिले जाणाऱ्या सोयाबीन हे हे 62 रुपये प्रति किलो या भावाने दिले जायचे. यावेळेस यामध्ये बारा रुपये किलोला भाव वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 30 किलो बॅगमागे तब्बल 360 रुपयांची भाववाढ झाली आहे. तर क्विंटल मागे एक हजार रुपये पेक्षाही जास्तीची भाव वाढ केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
महाबीज राज्यातील शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बीजोत्पादन करून घेत असते. मागच्या वर्षी सोयाबीनच्या बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 4160 रुपयांचा भाव मिळाला होता. यावर्षी यात एक हजार रुपयांनी वाढ करून 5182 रुपये प्रतिक्विंटल ने महाबीजने शेतकऱ्याकडून सोयाबीनचे बियाणे घेतले आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हे आपल्याकडील सोयाबीनचा बियाण्यासाठी वापर करत असतात. मात्र जी खरेदी बाजारातून सोयाबीनच्या बियाण्याची केली जाते त्यात सगळ्यात मोठा वाटा हा महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा आहे. विशेष म्हणजे मान्सून एक आठवड्यावर येऊन ठेपला असतानाही महाबीजकडून त्यांचे दर जाहीर न केल्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या या महासंकट काळामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या खते व बियाण्यांची उपलब्धता करून देणे हे सरकारचं कर्तव्य असताना पेरणीच्या ऐन तोंडावरच सरकारच्या अधीन असणाऱ्या महाबीज महामंडळाकडून सोयाबीन बियाण्यांची झालेली ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे. उत्पादन खर्च वाढल्याने बियाण्यांची भाववाढ झाली असली तरी त्यावर सरकारने उपाय सुचवणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement