(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गर्भलिंगनिदान करणार्या शिकाऊ डॉक्टरला ठोकल्या बेड्या, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Beed News Update : सतीश सोनवणे हा तमिळनाडू येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मात्र, नापास झाल्याने तो जालना येथे एका डॉक्टरांकडे काम करू लागला. सोनवणे याने गर्भलिंगनिदान करण्यासाठी एक पोर्टेबल मशीन विकत घेतली होती.
Beed News Update : बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून गर्भलिंगनिदान प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आता गर्भलिंगनिदान करणार्या एका शिकाऊ डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतीश बाळू सोनवणे असं संशयीत आरोपीचं नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या जाधववाडी गावचा रहिवासी आहे.
सतीश सोनवणे हा तमिळनाडू येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मात्र, नापास झाल्याने तो जालना येथे एका डॉक्टरांकडे काम करू लागला. सोनवणे याने गर्भलिंगनिदान करण्यासाठी एक पोर्टेबल मशीन विकत घेतली होती. बीडच्या गर्भलिंगनिदान प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा सानप हीच्या सोबत तो काम करत होता. एका तपासणीसाठी तो दहा हजार रुपये घेत असे. गेल्या चार महिन्यांपासून मनीषा सानप हिच्या गेवराई येथील घरी हे दोघे मिळून गर्भलिंग चाचणी करत होते.
गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांची चार पथके त्याच्या मागावर होती. त्याने मोबाईल बंद केल्याने त्याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. मात्र काही तांत्रिक तपास करुन बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अहमदनगर येथून अटक केली आहे. यानंतर आणखी काही धागेदोरे या प्रकरणात आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवासंपासून बीडमध्ये अनेक अवैध गर्भपात प्रकरणे समोर आली आहेत. शीतल गाडे (वय 30, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान 5 जून रोजी मृत्यू झाला. गर्भपात करणारी सीमा डोंगरे हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याच प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली मनिषा सानप ही अंगणवाडी सेविका सध्या कारागृहात आहे. तर मुख्य आरोपी म्हणजे गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर सोनवणे फरार होता. पोलिसांनी आज त्याला औरंगाबाद येथून अटक केली.