Manjra Dam: गुड न्यूज! मांजरा धरण अखेरीस 'एवढं' भरलं, बीड, धाराशिव, लातूरच्या पाण्याची चिंता मिटली
मराठवाड्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वात उशीरा हा प्रकल्प भरला आहे.
Beed: यंदा राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत धरणसाठ्यात मागे असलेल्या मराठवाड्यात धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण फुल्ल झाल्यानंतर अर्धी चिंता मिटली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये धरणसाठा जेमतेमच होता. आता परतीच्या पावसाचा वाढलेला जोर या धरणांसाठी फायद्याचा ठरतोय. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवणारे मांजरा धरण अखेरीस ९० टक्के भरले आहे. मराठवाड्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वात उशीरा हा प्रकल्प भरला आहे.
बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 90.42% भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मांजरा धरण 90.42% भरले आहे. 1392 क्युसेक्स वेगाने सध्या धरणात पाण्याची आवक सुरू आहे. तर पाणी पातळी 642 मिलिमीटरवर वर पोहोचली आहे. धरण परिसर क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
2020 -21 व 22 मध्ये मांजरा धरण भरले होते. परिणामी प्रकल्पाचे उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्ष शेतीला पाणी मिळालं होतं. मागील वर्षी मांजरा धरण प्रकल्प न भरल्याने शेतीला पाणी मिळाले नाही. पण यंदा 90.42 % टक्के होऊन अधिक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. केज तालुक्यातील मांजरा धरण हे बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्याच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. या महत्वपूर्ण धरणाची वाटचाल पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मागील काही दिवसांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
माजलगाव धरणातही पाण्याची चांगली आवक
मागील वर्षापासून शुन्यावर व महिनाभरापूर्वी मृतसाठ्यात असणारं माजलगाव धरण ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानं एका दिवसात १८ टक्क्यांवार गेले होते. आता माजलगाव धरणात 80.10 टक्के पाणीसाठा झाला असून बीड शहरातील शेतकऱ्यांच्या पिकांसह नागरिकांची तहान भागणार आहे. मागील वर्षी माजलगाव धरण याच सुमारास 50.82 टक्क्यांवर होते. यंदा पाऊस चांगला झाल्यानं बीडकरांची चिंता मिटली आहे.
हेही वाचा:
पितृपंधरवड्यामुळं भाज्यांची मागणी वाढली, बळीराजाला फायदा, कोणत्या भाजीला किती दर?