Crime News : मृत समजून पोस्टमार्टमसाठी नेलं, पण अचानक स्ट्रेचरवर उठून उभा राहिला; कोणाला काहीच कळेना, एकच गोंधळ-गडबड
Crime News : मृत समजून पोस्टमार्टमसाठी नेलं, पण अचानक स्ट्रेचरवर उठून उभा राहिला; कोणाला काहीच कळेना, एकच गोंधळ-गडबड
Crime News : एका व्यक्तीचं शव डॉक्टर पोस्टमार्टमसाठी घेऊन जात होते, त्यावेळी एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पोस्टमार्टसाठी ज्या व्यक्तीचं शव घेऊन जात होते. ती व्यक्ती अचानक उठून उभी राहिली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली. काय होतंय, काय झालंय? कुणालाच काही कळेना. डॉक्टरांची तर पुरती भंबेरी उडाली होती.
बिहारच्या शरीफमध्ये ज्या व्यक्तीचा मृतदेह डॉक्टरांनी मृत समजून पोस्टमार्टमसाठी नेला, त्या व्यक्तीचा प्रत्यक्षात मृत्यू झालाच नव्हता. तो व्यक्ती अचानक उभा राहिला. अचानक घडलेल्या घटनेनं डॉक्टरही हादरले आहेत.
सोमवारी एका सफाई कर्मचाऱ्यानं पहिल्या मजल्यावरील टॉयलेटचा दरवाजा सकाळपासून आतून बंद असल्याची माहिती प्रशासनाला दिली. या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून शौचालयात गेले. दरवाजा तोडल्यानंतर पोलीस टॉयलेटमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की, एक तरुण जमिनीवर पडलेला होता. डॉक्टरांनी त्या व्यक्तीची नाडी तपासली, त्यावेळी तो व्यक्ती मृत झाल्याचं त्यांनी सांगितलं. हळूहळू प्रसाधनगृहात मृतदेह सापडल्याची बातमी रुग्णालयात वणव्यासारखी पसरली.
पोलिसांनीही त्या व्यक्तीचं शव बाथरूममधून बाहेर काढलं आणि एफएसएल टीमची वाट पाहत होते. दरम्यान, कोणीतरी ही बाब सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्रकुमार सिंह यांना कळवली. जेव्हा सिव्हिल सर्जननं बाथरूममध्ये येऊन त्याला पाहिले, तेव्हा त्याची नाडीही न तपासता, त्यांनी सफाई कामगाराला शवविच्छेदन गृहात नेण्याचे आदेश दिले.
पोस्टमार्टमची तयारी सुरू असतानाच...
मृत व्यक्तीच्या पोस्ट मार्टमची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मृत समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला अचानक शुद्ध आली. आसपासच्या लोकांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं. त्यानंतर घाबरलेली व्यक्ती चटकन स्ट्रेचरवरुन उठून उभी राहिली. समोर काय घडतंय, हे डॉक्टरांसोबतच पोलिसांच्या कल्पने पलिकडचं होतं. सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
नशेच्या धुंदीत बेशुद्ध पडलेला
सदर व्यक्ती अस्थावां पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जिराइन गावात राहणारी असून या व्यक्तीचं नाव राकेश कुमार होतं. सदर रुग्णालयात ते औषध घेण्यासाठी आले होते. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असल्यानं ते तिथेच बेशुद्ध पडले. सदर हॉस्पिटलमध्ये त्या तरुणाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. सीएसनं सांगितले की, तरुण मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे तो टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडला होता.