Beed Firing Update : रोहित पवारांच्या विरोधात धनंजय मुंडे समर्थक आक्रमक; परळी गोळीबार प्रकरणातील वक्तव्यामुळे उद्या परळी बंदची हाक
Beed Firing Update : परळीत झालेल्या गोळीबार प्रकरणात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या परळी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.
Beed News बीड : परळीत झालेल्या गोळीबार प्रकरणात (Beed Firing News) रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उद्या परळी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. तरूण सरपंचाची निर्घृण हत्या झाली तरी रोहित पवारांचे चामडी बचाव आणि राजकीय पोळी भाजण्याचे धोरण असल्याचा आरोप धनंजय मुडे समर्थकांनी केला.
शनिवारी (29 जून) रोजी रात्री परळीमध्ये संपूर्ण जिल्हा हादरवणारी घटना घडली. धनंजय मुंडे समर्थक आणि मरळवडीचे सरपंच असलेले बापू आंधळे (Bapu Aandhle) यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात आणिखी एक तरूणही गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झूंज सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे बबन गीते यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार केल्यावरून राजकीय वर्तूळात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
रोहित पवारांच्या विरोधात धनंजय मुंडे समर्थक आक्रमक
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना स्वतः ची आणि आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे आणि त्याच्या कुटुंबविषयी सहनुभूती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत असून, धनंजय मुंडे यांची आणि परळीची बदनामी करत सुटले आहेत. असा आरोप धनंजय मुंडे समर्थकाने केलाय आणि याच वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
“परळीतील लोक चांगले आहेत. साफ मनाचे आहेत. तिथे असणारे नेते आहेत, पंकजा मुंडे यांच्याबद्द्ल बोलत नाही. कारण तिथे त्यांचं खूप चालतं असं नाही. तिथल्या गुंडागर्दीच्या वातावरणात त्यांचे कार्यकर्ते हे प्रकरणे सांभाळतात. त्यांचे प्रवृत्ती, बॅकग्राउंड पाहिल्यास असे लक्षात येते की या व्यक्ती या सगळ्यात माहीर आहेत. छाेट्या छोट्या व्यवसायिकांकडून कमिशन मागायला ते कमी करत नाहीत. राहिला प्रश्न गीतेंचा, खरं काय खोटं काय हे बघाव लागेल ” असे रोहित पवार म्हणाले. परळीतल्या लोकांना मी कोणाविषयी बोलतोय ते कळेलच असेही ते म्हणाले . यावरून धनंजय मुंडे समर्थकांनी कातडी बचाव धाेरण असल्याचा आरोप केला.
इतर महत्वाच्या बातम्या