Rain News : विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम, 'या' भागात पावसाची हजेरी
IMD Rain Forecast : देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे.
IMD Rain Alert : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (IMD Rain Alert) आहे. काश्मीर खोऱ्यात आज जोरदार बर्फवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासात देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. देशासह राज्यातही पावसाची शक्यता कायम आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम
देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) आज पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, आज विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून या भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात हिंगोली, परभणी, बीड अमरावती या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी
आयएमडीच्या अंदाजानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही गारवा वाढला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता नाही, मात्र धुक्यासह थंडीचा कडाका कायम राहणार आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम हिमालयीन प्रदेशावर होणार असल्याने 7 मार्चला जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.