एकेकाळी कट्टर विरोधक, आता लोकसभेसाठी एकत्र येणार, दीपक केसरकरांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Deepak Kesarkar : कोकणातील राणे आणि केसरकर वाद सर्वश्रुत असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Deepak Kesarkar : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्याकरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. एकेकाळी कट्टर राणे विरोधक अणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे.
कोकणातील राणे आणि केसरकर वाद सर्वश्रुत असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "लोकसभेला नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. मंत्री केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण नारायण राणेंचा आदराने उल्लेख करतो असं देखील म्हणाले आहेत. कोकणात दहशतवाद असा नेहमी उल्लेख करणारे आणि लोकसभेला नारायण राणेंच्या पुत्राला आपणच पाडलं असं ठणकावून सांगणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांनीच तोंडात बोटं घातली आहेत.
"संजय राऊत यांना बोलण्याची शिस्त नाही. जगभरात काय चाललंय याची माहिती घेणं गरजेचं आहे. उगाच काहीतरी रोज बोलत राहायचं. अगोदरच या बोलण्यामुळे शिवसेना संपत आली आहे. संजय राऊत यांनीच शिवसेनेला राष्ट्रवादीकडे घेऊन गेले होते. उरलेल्या शिवसेनेला संपवण्याचा राऊत यांचा डाव असल्याचा घणाघात दीपक केसरकर यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाओस दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी ही टीका केलीय.
राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय वाद काय?
सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासूनच दीपक केसरकर आणि राणे यांच राजकीय वैर होतं. 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या समेट घडून नारायण राणेंना दीपक केसरकर यांना मदत करण्यास सांगितल्यामुळेच दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. दीपक केसरकर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे आणि केसरकर यांचं सख्ख्य नव्हतं. त्यामुळेच नेहमी राणेंच्या विरोधात बोलणारे दीपक केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेत गेले आणि त्यानंतर 2014 पासून आतापर्यंत दीपक केसरकर यांनी नेहमी नारायण राणे आणि कुटुंबीयांनी जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप करत राहिले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा प्रचार करावा लागणार म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत उडी मारली. याचं कारण म्हणजे राणेंनी 2009 मध्ये दीपक केसरकर यांना मदत केली होती. त्यामुळे आधीच राणे आणि शिवसेना यांचं राजकीय वैर होताच. त्यात दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेच्या विरोधात बोलण्यास केसरकराना खुल मैदान मिळालं. त्यामुळे 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर नेहमी राणेंच्या विरोधात बोलत असताना दहशतवाद या मुद्द्यावर बोलत राहिले. दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेनेच्या वतीने दीपक केसरकर यांनी नेहमी राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा प्रचारात आणला. याचाच फटका नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत बसला आणि राणेंचा पराभव झाला. हाच पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही जिल्ह्यात कुठेही जाहीर व्यासपीठावर राजकीय भाषण करताना 2014 च्या पराभवाचा छल्य बोलून दाखवत असतात. हेच कारण आहे की राणे आणि केसरकर यांचं राजकीय वाद आहेत.