Sadabhau Khot: आम्ही भाजपमध्ये काम करतो तो सुसंस्कृत पक्ष, हा मार खाणारा नाही, सर्जिकल स्ट्राईक करणारा, पाकिस्तानला सुद्धा माहिती : सदाभाऊ खोत
Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर होत असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या आरोपावर खुलासा केला आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं याचा सुद्धा किस्सा सदाभाऊ खोत यांनी सांगितला.

Sadabhau Khot: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही एखाद्याला चोर चोर म्हणून ओरडत असाल तर उद्रेक होणारच असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर होत असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या आरोपावर खुलासा केला आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं याचा सुद्धा किस्सा सदाभाऊ खोत यांनी सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. सदाभाऊ खोत हे गोपीनाथ पडळकर यांचा बचाव करताना दिसून आले. त्यांनी भाजपचं सुद्धा जोरदार कौतुक केले. ते म्हणाले की आम्ही भाजपमध्ये काम करतो हा सुसंस्कृत पक्ष आहे. हा मार खाणारा पक्ष नाही, तर सर्जिकल स्ट्राइक करणारा पक्ष असल्याची माहिती पाकिस्तानला सुद्धा असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मंगळसूत्र प्रकरणावर चर्चा करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, सभागृहाला मोठी परंपरा आहे. या सभागृहाचा आम्ही सन्मान ठेवतो अशा परिसरात देशाच्या राज्याच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा भावनेच्या भरात काही गोष्टी घडतात. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहत आहे. माझा लोकप्रतिनिधी विधीमंडळात माझ्या काय व्यथा मांडत आहे. परंतु कालचा जो प्रकार झाला किंवा मागील 2 दिवसांपासून जे होतं आहे हे व्हायला नाही पाहिजे. परंतु जे जेष्ट सदस्य असतात त्यांना सभागृहाचा अनुभव असतो त्यांना काम कसं कराव हे माहिती असतं. रणांगणावरची लढाई रणांगणात लढायला हवी. हे रणांगण नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्याचे हे छत्र आहे. इथं काय घडलं तर एक ज्येष्ठ सदस्य ते उगाचच ओरडत आले चोर चोर चोर म्हणून. या घटनेची पार्श्वभूमी काय आहे? हे तपासणार आहात की नाही.
चोर, चोर, चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार
माझे मित्र (गोपीचंद पडळकर) खरसुंडी तालुका आटपाडी येथे एका लग्नाला गेले होते. ते लग्न झाल्यानंतर माझे मित्र 2 तासांनंतर त्या लग्नाच्या ठिकाणी पोहचले. त्यापूर्वी तिथ पाहुण्यांची भांडणं झाली होती. त्याठिकाणी ज्यांची भांडण झाली होती त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची जवळीकता होती. त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि गुन्हा दाखल करायला लावला. एका 65 वर्षाच्या महिलेला यांनी गुन्हा दाखल करायला लावलं. मात्र, कोर्टातून माझ्या मित्राला कोर्टाने निर्दोष सोडलं. कारण त्या महिलेने केस मागे घेतली. तरीसुद्धा हे न पाहता तुम्ही एखाद्याला चोर, चोर, चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार.
तुम्हाला दरोडेखोर दरोडेखोर म्हणालो तर तुम्हाला चालेल का?
ते पुढे म्हणाले की, मागील 65 वर्षात पिण्याचं पाणी दिलं नाही, शेतीला पाणी दिलं नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिलेला नाही. शेतकरी आंदोलन करायला गेला तर तुम्ही लाठ्या चालवल्या, बँका तुमच्या काळात रसातळाला गेल्या, साखर कारखाने विकून खाल्ले, सूतगिरण्या विकून खाल्ल्या, रस्त्यावरच डांबर विकून खाल्ल, मुरूम विकून खाल्ला हे सगळं काढलं आणि तुम्हाला दरोडेखोर दरोडेखोर म्हणालो तर तुम्हाला चालेल का?
























