Gopichand Padalkar: अध्यक्ष, काय कळालं तुम्हाला या विषयात? गोपीचंद पडळकर विधिमंडळातही बेलगाम; दादा भुसेंनी जागेवर टोकताच तिथंही तोंडाचा पट्टा थांबेना!
Gopichand Padalkar: लक्षवेधी मांडताना पडळकर तालिका अध्यक्ष आणि मंत्री दादा भूसे यांच्यावरही भडकल्याचे दिसून आले. त्यांनी तालिका अध्यक्षांना उद्देशून काय कळालं तुम्हाला या विषयात अशी विचारणा केली.

Gopichand Padalkar: विधानभवनात स्वत: शिव्या देत असतानाही आणि गावगुंड कार्यकर्त्याच्या कारनाम्यानंतरही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुजोरी कायम आहे. मागासवर्गीय मुलांना गुणवत्ता यादीत आल्यास खुल्या यादी दाखवण्यात येत नाही याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र, ही लक्षवेधी मांडताना पडळकर तालिका अध्यक्ष आणि मंत्री दादा भूसे यांच्यावरही भडकल्याचे दिसून आले. त्यांनी तालिका अध्यक्षांना उद्देशून काय कळालं तुम्हाला या विषयात अशी विचारणा केली.
पडळकर यांनी 1997 च्या पत्रकानुसार सरकारची भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मेरिटमध्ये आला तो खुल्या गटात बसत असेल तर तो घ्यावा. मात्र, आता अधिकाऱ्यांकडून मागासवर्गीयांची मुलं होती, मेरिटमध्ये आल्यानंतर तुम्ही ओपनमध्ये का दाखवत नाही? त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवत आहात. जातीच्या बिंदूवर दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही. हे मी पुरावे घेऊन आलो असल्याचे सांगत लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकरांना तालिका अध्यक्षांनी त्यांना प्रश्न मांडण्यास सांगितलं. यावेळी गोपीचंद पडळकरांचा पारा चढल्याचे दिसून आले. मला बोलू दिलं जात नसेल, तर मी लक्षवेधी मागे घेत असल्याचे म्हणाले.
काय कळालं तुम्हाला या विषयात?
यानंतर पडळकर यांनी पुण्याचे उदाहरण दिलं. ते म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 पासून जी शिक्षकांची भरती झाली, या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला 66.67 मार्क मिळाले. हे ओपनच्या यादीत आहेत. ओबीसीच्या यादीत दाखवलेली 16 मुलं, एससीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं, एनटी यादीत दाखवलेली दोन मुलं ही 66.67 पेक्षा जास्त आहेत. त्यांना खुल्या दाखवलं नाही. यावेळी अध्यक्षांनी मंत्री महोयदयांनी उत्तर द्यावं, असे सांगितले. यावेळी पडळकर यांचा पारा चढला. न्याय द्यायचा विषय नसेल, तर सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले. तू प्रश्न विचारू देत नाही, तर काय उत्तर देणार? असे पडळकर म्हणाले. काय कळालं तुम्हाला या विषयात? अशीही विचारणा केली.
तुम्ही मला काय ऐकवता?
यावेळी पडळकर यांचा भाषेचा टोन पाहून दादा भूसे संतापल्याचे दिसून आले. ऐकून घ्या, वास्तविक तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हते असे सांगत दादा भूसेंनी उत्त देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांनी तुम्ही मला काय ऐकवता? असे पडळकर म्हणाले. तुम्ही नव्हता, तरी मी थांबून राहिलो असल्याचे दादा भूसे म्हणाले. चौथी लक्षवेधी परत घेण्यास मी सांगितल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या, विषयाचा गांभीर्य आम्हाला पण आहे. आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांची चौकशी करू, कारवाई करू परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या, असे भूसे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























