Presidential Elections 2022 : शिवसेनेचं ठरलं... राष्ट्रपती निवडणुकीत 'या' उमेदवाराला पाठिंबा देणार!
Maharashtra Politics : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पांठिंबा देणार असल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Maharashtra Politics : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
राष्ट्रपती पदासाठी शिवसेना एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौैपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेकडून आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या निर्णयाला खरंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरे यांनी बहुतांश खासदारांच्या मागणीला मान देणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं होतं. याच मुद्द्यावरून शिववसेनेचे खासदारही फुटणार अशी चर्चा रंगायाला लागली होती. अखेर शिवसेना आपलं वजन द्रौपदी मुर्मू यांच्याच पारड्यात टाकणार असल्याचं दिसतंय. मात्र यावरून महाविकास आघाडीत फूट पडणार का? हे पाहावं लागणार आहे.
मुर्मू यांच्याबाबत बैठकीत चर्चा, राजकारणापलिकडे जाऊन याआधीही निर्णय घेतले : संजय राऊत
काल मातोश्री (Matoshree) बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला आपलं समर्थन देणार यावर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत असे म्हणाले आहेत. ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही चर्चा दोन्ही बाजूनी झाली. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेनं यापूर्वीही अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं आहे'', असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
शिंदे गटाला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण
राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आली आहे. आता या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.
दरम्यान, सर्वात आधी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हीच मागणी आणखी 11 खासदार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेतील खासदारांनी केल्यानं आधीच आमदारांच्या बंडामुळे पक्षाला पडलेली खिंडार भरुन काढताना खासदारांच्या मागणीचा विचार उद्धव ठाकरे करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच आता सुत्रांच्या हवाल्यानं आलेल्या माहितीवरुन, उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.