(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल शेवाळेंपाठोपाठ राजेंद्र गावित यांचं उद्धव ठाकरेंना पत्र, राष्ट्रपतीपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी
40 आमदारांनंतर आता शिवसेना खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण राहुल शेवाळे यांच्यानंतर आता खासदार राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपतीपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
पालघर : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. 40 आमदारांनंतर आता शिवसेना खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यापूर्वी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करणारं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं.
पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे आदिवासी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. ते स्वतः आदिवासी समाजाचे आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आदिम जमातीतील आदिवासी महिला द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. हे पत्र 6 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आहे. याआधी खासदार राहुल शेवाळे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.
पत्रात राजेंद्र गावित काय म्हणाले?
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील आणि प्रख्यात अर्थतज्ञ स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या काही जरी असलं तरी मोठं मन करुन तसाच पाठिंबा स्वातंत्र्यानंतर पहिल्या आदिवासी महिलेला मिळालेला या सर्वोच्च पदासाठी द्यावा. यामुळे संपूर्ण आदिवासी समाज उद्धव ठाकरे यांचं मनापासून स्वागत करेल, असं गावित यांनी पत्रात म्हटलं आहे. मला आशा आहे उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी आशा देखील गावित यांनी व्यक्त केली.
सध्या तरी शिवसेनेत, पुढे काय होईल सांगता येत नाही : राजेंद्र गावित
त्याचबरोबर राजेंद्र गावित यांनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या तरी शिवसेनेसोबत असून पुढे काय होईल ते सांगता येत नाही असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.
आधीच बंडामुळे पक्षाला खिंडार, खासदारांच्या पत्रानंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
दरम्यान सर्वात आधी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर याच विचाराचे आणखी 11 खासदार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेतील खासदारांनी केल्याने आधीच आमदारांच्या बंडामुळे पक्षाला पडलेली खिंडार भरुन काढताना खासदारांच्या मागणीकडे आता उद्धव ठाकरे यांना लक्ष द्यावं लागेल हे नक्की.