फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात, 30 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते उद्धाटन
Uday Samant : एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. आता हा प्रकल्प वडोदऱ्याला होणार आहे.
मुंबई : फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. आता या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
C-295 transport aircraft for the Indian Air Force to be manufactured by Tata-Airbus at Vadodara in Gujarat: Defence Officials pic.twitter.com/0txKqTlDIX
— ANI (@ANI) October 27, 2022
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचं सांगितलं होतं. 22 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण आता हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी वडोदऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं उद्धाटन करणार आहेत.
या आधी हजारो कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, जो महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार देणार होता, तो प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला जाणार आहे.
काय आहे हा C-295 प्रकल्प?
'मेक इन इंडिया' आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली येथे 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, करारा अंतर्गत, 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील आणि 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.
Tata Airbus in Gujarat :'माझा कट्टा'कार्यक्रमात उदय सामंतांची नागपुरात प्रकल्प होणार असल्याची माहिती