Omicron Cases : राज्यात ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांची भर, एकूण रुग्ण 40 तर आतापर्यंत 25 जणांची ओमायक्रॉनवर मात
Omicron Cases In Maharshtra : महाराष्ट्रात शुक्रावारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णाची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहचली आहे.
Omicron Cases In Maharshtra : महाराष्ट्रात शुक्रावारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णाची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णापैकी सहा रुग्ण पुण्यातील आहेत. तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येकी एका-एका रुग्णाचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे.
शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात आणखी आठ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 6 रुग्ण पुणे, एक रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 40 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यामध्ये मुंबईत 14, पिंपरी चिंचवड -10, पुणे ग्रामीण-6, पुणे मनपा -2 , कल्याण डोंबिवली – 2, उस्मानाबाद -2, बुलढाणा-1 नागपूर -1 ,लातूर -1 आणि वसई विरार -1 असे रुग्ण आढळले आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 25 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या सर्व रुग्णाचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. आज आढळलेल्या सर्व रुग्णाचे वय 29 ते 45 यादरम्यान आहे. आठ रुग्णापैकी सात जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर एका रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत. प्राथमिक माहितीनुसार आज आढळलेल्या पुणे येथील चार रुग्णांचा दुबई प्रवास, आणि दोन रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील एका रुग्णांचा नाजेरिया प्रवास आहे. आज आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर दोन जण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. आज आढळलेल्या आठही रुग्णाचे लसीकरण झालं आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात आज 902 रुग्णांची नोंद -
राज्यात आज 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आजपर्यंत एकूण 64,95,929 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे.