मराठा आरक्षणासाठीचा आणखी एक बळी, सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या; लातूरमधील घटना
Suicide in Latur : जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देखील नातेवाईकांनी घेतली आहे.
लातूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) होणाऱ्या आत्महत्या (Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील सावनगीरी येथील एका तरुणाने चिठ्ठी लिहून शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, 'मराठा आरक्षणासाठी फाशी घेत आहे' अशी सुसाईड नोट देखील त्याच्याजवळ सापडली आहे. या घटनेनंतर मराठा समाज बांधव आणि तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देखील नातेवाईकांनी घेतली आहे. करण युवराज सोळुंके (वय 24 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी मागणी करत जिल्ह्यातील सावनगीर येथील 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण युवराज सोळुंके असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. बीकॉमचे शिक्षण झालेला करण सुशिक्षित बेरोजगार आहे. दोघा भावात पाच एकर शेती आहे. करण याने आत्महत्या केल्याचं सकाळी लक्षात आहे. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली होती. तर, घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला
दरम्यान, आज सकाळी या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या गावातील अनेक तरुणांनी निलंगा येथील रुग्णालयाकडे धाव घेतली. मृताच्या नातेवाईकांना योग्य तो न्याय जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. तर, उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे, प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने पोलीस उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले असून, बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे
मराठा आरक्षणासाठी किरणने आत्महत्या केल्याचे समोर येताच नातेवाईक आणि मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहे. "ज्या कारणासाठी गावातील एका होतकरू तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्याबाबत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे, त्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येईल," असे गावातील ग्रामस्थांची भूमिका आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय'?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या