(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय'?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या
Maratha Reservation : हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं आहे. या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे.
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आत्महत्या (Suicide) काही थांबायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं आहे. या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे. आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचे नाव असून, तो उच्चशिक्षित होता. मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.
सुसाईड नोटमध्ये काय लिहलं?
एक मराठा लाख मराठा...मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आत्महत्या?
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे देखील एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने या 39 वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय साईनाथ सोनवणे असे मयताचे नाव आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आते.
जरांगेंचा महाराष्ट्र दौरा, आत्महत्या रोखण्यासाठी करणार आवाहन...
मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असे आवाहन करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
तर ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक