(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील! उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून एल्गार
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आज गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
Kolhapur : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आज गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच माजी आमदार उपस्थित आहेत. दुसरीकडे चलबिचल असलेल्या खासदार धैर्यशील माने यांची अनुपस्थितीने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील, असा इशाराच शिवसैनिकांनी यावेळी दिला. पक्षप्रमुखांचा आदेश, पुन्हा नाही राजेश अशा घोषणही यावेळी देण्यात आल्या. जे गेले ते कावळे, उरले ते मावळे अशाही घोषणाही देण्यात आल्या. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. दरम्यान, काल दिवसभरात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे पण नॉटरिचेबल होते. त्यामुळे ते शिंदे गटाला जाऊन मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालेही तसेच.
राजेश क्षीरसागर आज गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील राज्य आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एक माजी आणि एक आजी आणि एक अपक्ष असे तीन आमदार शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत.