Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे.
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या दोन तुकड्या रवाना
कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा, तसेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली झपाट्याने वाढ यामुळे पुण्याहून कोल्हापूर एनडीआरएफच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. यामध्ये एका तुकडीत 25 जवान असे 50 जवान कोल्हापूर जिल्ह्यात पोहचणार आहेत. एनडीआरएफची एक तुकडी शहरी भागात तर दुसरी ग्रामीण भागात तैनात असेल.
दुसरीकडे पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आठ जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने अनेकांचे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला गेला आहे.